नागपूर : महाराष्ट्र विधानसभेत आज 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेवरून झालेल्या गदारोळात सत्ताधारी महायुती सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीवर ठाम विश्वास व्यक्त केला. विरोधी पक्षाने eKYC त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांवरून सभागृहात गोंधळ घातला आणि अखेरीस सभात्याग केला. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आणि ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्यातील कोट्यवधी महिलांना दिली.
विरोधकांचा गोंधळ आणि 'राजकीय पोटशूळ'
विधानसभेच्या प्रश्नोत्तर सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. गैरव्यवहार झाला असून, संबंधितांवर गुन्हे दाखल होणार का, असा प्रश्न त्यांनी विचारल eKYC प्रक्रियेमुळे अपात्र ठरलेल्या महिलांच्या पुनरावलोकनाबाबत विरोधकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा त्यांनी दावा केला. पाटील यांनी ₹१५०० मदत ₹२१०० कधी करणार, तसेच मुख्यमंत्री पदाबाबत 'एक नंबर, २ नंबर' असे चिमटे काढून सत्ताधारी पक्षांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
महिला व बालकल्याण मंत्र्यांचे ठोस उत्तर
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विरोधकांच्या आरोपांना स्पष्ट उत्तर दिले. अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जात नाहीत. केवळ स्वतःहून पैसे परत करू इच्छिणाऱ्यांचे पैसे स्वीकारले जातील. त्यांनी स्पष्ट केले की, योजनेबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत, पण ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरूच राहणार आहे. मंत्री तटकरे यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केला.
एकनाथ शिंदे यांचा 'लाडक्या बहिणीं'साठी ठाम निर्धार
विरोधी पक्षाच्या सभात्यागानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना विरोधकांवर थेट हल्ला चढवला. "लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. आम्हीच ही योजना सुरू केली असून, ती यशस्वीपणे सुरू राहील." उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेचे श्रेय घेत, महिलांना भावनिक साद घातली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला.