पुणे: निष्पाप गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबाबत व १०८.३० कोटी रुपयांच्या डेअरी घोटाळ्याप्रकरणी बारामती व इंदापूर व पुणे जिल्ह्यातील ५ ठिकाणांवर छापे घालण्यात आले आहेत. विद्यानंद डेअरी प्रायव्हेट लिमिटेड, आनंद सतीश लोखंडे, व विद्यानंद अँग्रोफिड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर ही अंमलबजावणी संचनालयाने (Enforcement Directorate ED) हे छापे टाकले आहेत. यापैकी दोन धाडी पुण्यात, दोन धाडी बारामती व एक इंदापूर तालुक्यात घालण्यात आलेली आहे. ईडीने कलम १७ मनी लॉन्ड्रिंग कायदा २०२२ अंतर्गत ही कारवाई सुरू केलेली असून संबंधित प्रकरणात संशयितांची सखोल चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकरणात विद्यानंद डेअरी, विद्यानंद अँग्रोफिड या दोन कंपनीच्या माध्यमातून लोखंडे व त्यांच्या परिवाराने गुंतवणूकदारांना मोठी स्वप्न दाखवून कंपनीच्या अवास्तविक संभाव्य नफ्याची माहिती देत मोठी रक्कम प्राप्त केली असल्याची माहिती ईडीकडून मिळत आहे.
कथित प्रकरणात आरोपींनी वास्तविक ज्या कारणासाठी गुंतवणूक निधी मिळवला होता त्यासाठी नसून भलत्याच कारणांसाठी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून पैसे दुसरीकडे वळते केले आहेत असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. उद्योगाला लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी व भांडवलासाठी गुंतवणूकदारांकडून हा निधी मिळविण्यात आला होता मात्र गुंतवणूक ज्या उद्देशाने करण्यात आली होती ती न होता कंपनीने निधी वळवला अशी तक्रार ईडीकडे तक्रारदारांनी दाखल केली होती. त्यावर बुधवारी ईडीने संबंधित आरोपीच्या ठिकाणी छापेमारी करत चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात कलम १७ मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत लोखंडे व त्यांच्या दोन कंपन्यावर एफआरआर दाखल केला आहे.