गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा देश सोडून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. अग्निकांडाची घटना घडल्यानंतर पाच तासांनी सौरभ आणि गौरव यांनी मुंबईहून इंडिगोच्या विमानाने थायलंडमधील फुकेत गाठल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. हे दोघेही परदेशात नेमके कुठे गेले? या प्रकरणाचा तपास सुरु असून अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत घेण्याची योजना आखली आहे.
बर्च बाय रोमियो लेन क्लबला रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यात जास्त प्रमाणात क्लबचे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या घटनेतील आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे दिल्लीला असल्याने एफआयआर दाखल होताच पोलिसांचे एक पथक तातडीने दिल्लीला पोहोचले. दोघांशी संबंधित सर्व ठिकाणांवर पोलिसांकडून धाडी घालण्यात आल्या. पण दोघेही सापडले नाहीत. त्यानंतर त्यांच्या घरांवर कायदेशीर नोटिसा चिकटवण्यात आल्या.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबरच्या संध्याकाळी दोघांविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले. यानंतर मुंबई इमिग्रेशनशी संपर्क साधण्यात आला. दोन्ही आरोपी ७ डिसेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजता इंडिगोच्या फ्लाईट 6E 1073 ने फुकेटसाठी रवाना झाले होते. गोवा पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी संपर्क साधलेला आहे. दोघांना लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी दिल्लीहून भारत कोहलीला ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील चौकशीसाठी गोव्याला आणण्यात आले आहे.






