Tuesday, December 9, 2025

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्याच्या विधानमंडळात मोठे वादंग निर्माण झाले आहे. या व्हिडिओ क्लिपमुळे सभागृहाच्या प्रतिमेला तडा जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण? 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान थेट विधानपरिषद सभापती आणि सभागृहातील कामकाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. विशेष म्हणजे, ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य करण्यात आले, त्यावेळी आमदार रोहित पवार यांची उपस्थिती होती. या विडिओ क्लिपमुळे सभागृहाची प्रतिमा मलीन होऊन जनमानसात विश्वासार्हतेला तडा जात असल्याने भाजप आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हक्कभंगाची तयारी आणि कारवाईचे निर्देश:

या गंभीर प्रकरणानंतर विधानपरिषदेतील भाजप आमदारांनी संबंधित व्यक्ती विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सभागृहात त्यांनी स्पष्ट केले की, सूर्यकांत मोरे यांनी हे वक्तव्य केले तेव्हा आचारसंहिता भंग झालेला होता, त्यामुळे तेव्हा कोणतीही कारवाई झाली नव्हती.

यावर कठोर पाऊल उचलत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विशेष चौकशी समितीने अहवाल सादर करावा तसेच मोरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे मत व्यक्त केले. तसेच, त्यांनी सूर्यकांत मोरे यांच्यावर पोलीस यंत्रणेद्वारे कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या आक्षेपार्ह विधानामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा