नागपूर : "फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्य सरकार येत्या ६० दिवसांत आरोपपत्र न्यायालयात सादर करेल. या प्रकरणाची सर्व अंगाने सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्यात येईल", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. भाजप आमदार अमित साटम यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
फलटण येथील पोलीस निरीक्षक गोपाळ बदने याने पीडित महिला डॉक्टराला विवाहाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले होते, हे सिद्ध झाले आहे. या घटनेच्या ५ महिन्यांपूर्वी, ही महिला वैद्यकीय अधिकारी असल्याने ती मोठ्या गुन्ह्यांतील आरोपींना तंदुरस्त नसल्याचा वैद्यकीय अहवाल देत आहे, असे पत्र वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिले आहे. यातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर यानेही या महिला डॉक्टराची फसवणूक केली आहे, हे अन्वेषणात स्पष्ट झाले आहे. या महिलेने आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हातावर आरोपींची नावे लिहिली आहेत, हे खरे आहे. या प्रकरणाचे अन्वेषण राज्य राखीव बल गट क्रमांक १ च्या समादेशक तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली पथक करत आहे. या प्रकरणी महिला डॉक्टरने आरोपींसमवेत केलेले व्हॉट्सअप संभाषण आणि ती राहत असलेल्या खोलीसमोरील सीसीटीव्हीचे चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे; अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला दिली.
पीडितेच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी द्या - प्रकाश सोळंके
या वेळी विरोधकांनी या प्रकरणावरून राज्यात लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी तुलना करणे चुकीचे आहे. आम्ही राज्यातील महिलांना सुरक्षा देण्यासाठी खंबीर आणि कटिबद्ध आहोत. या वेळी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांतील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, पीडित महिला ही कंत्राटी पद्धतीने कामावर होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांतील सदस्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येत नाही. तरी या प्रकरणी पीडित कुटुंबियांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ते साहाय्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.