मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालयातील रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तातडीने आणि प्राधान्याने निराकरण करण्यात यावे. रुग्णांच्या नातलगांकडून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱयांवर होणाऱ्या अनुचित वागणुकीस आळा घालण्यासाठी रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम आणि कडेकोट करावी. संपूर्ण रुग्णालय परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली आणून सुरक्षा व्यवस्थेची अंमलबजावणी सुनिश्चित करावी. अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली कार्यक्षमतेने आणि काटेकोरपणे राबवावी, असे विविध निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील डॉ. रू. न. कूपर रुग्णालयास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी भेट देऊन रुग्णालयातील सेवांचा सर्वंकष आढावा घेतला. रुग्णसेवा अधिक परिणामकारक, सुलभ आणि रुग्णकेंद्रित करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित विभागांना ठोस व कार्यवाहीयोग्य निर्देश दिले. वैद्यकीय सेवांचा विस्तार, नवीन सुविधा, प्रलंबित कामे आणि आवश्यक सुधारणांबाबत गगराणी यांनी सविस्तर माहिती घेतली. उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर, औषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख व पदव्युत्तर अधिष्ठाता डॉ. नीलम रेडेकर, वैद्यकीय अधीक्षक देव शेट्टी, डॉ. प्रवीण बांगर तसेच इतर संबंधित अधिकारी या पाहणीवेळी उपस्थित होते.
रूग्णालय पाहणीची सुरुवात अपघात विभागातून करण्यात आली. तात्काळ उपचार व्यवस्था, स्वच्छता परिस्थिती, औषधसाठा, रुग्ण शय्या उपलब्धता, नोंदणी प्रणाली अशा महत्त्वाच्या घटकांचा गगराणी यांनी तपशीलवार आढावा घेतला. त्यानंतर सर्वसाधारण व विशेष उपचार विभाग, प्रसूतीगृह, बालरोग विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, कॅथ लॅब, प्रयोगशाळा आणि औषधवाटप केंद्राची पाहणी करून विद्यमान व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
रुग्णालयातील तांत्रिक अडचणी, यंत्रसामग्रीची स्थिती, मनुष्यबळाची उपलब्धता आणि प्रलंबित दुरुस्ती कामांविषयी गगराणी यांनी अधिकाऱयांकडून माहिती घेतली. ठराविक कालमर्यादेत दोष निराकरण आणि सुविधा उन्नतीकरणाची कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश गगराणी यांनी दिले. विशेषतः स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाबाबत अधिक काटेकोर पद्धतीने उपाययोजना राबवून रुग्णालय परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि रुग्णाभिमुख करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रुग्णांशी संवाद साधताना उपचार मिळण्याची गती, सुविधा, स्वच्छतागृहे, पाणी-प्रकाश व्यवस्था आणि इतर सेवांबाबत गगराणी यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. रुग्णांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन तत्काळ सुधारणात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना देण्यात आले.