नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक त्रासाचा आणि अन्य समस्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा करत महिलांना मोठा दिलासा दिला आहे.
महिलांच्या हाताच्या सुरक्षेसाठी मोठी घोषणा
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, कोळंबी सोलण्याचे काम करणाऱ्या आणि मासे विकणाऱ्या महिलांना काम करताना होणारा त्रास आणि हाताला होणारी इजा यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल. नितेश राणे म्हणाले, "कोळंबी सोलताना मच्छीमार विकणाऱ्या महिलांच्या हाताला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार केलेले आणि काही विदेशामधून महिलांच्या सुरक्षेसाठी 'हँड ग्लोज' मागवण्यात येणार आहेत." या हँड ग्लोजमुळे महिलांना काम करताना हाताला होणारे नुकसान आणि होणारा त्रास टळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुर्गंधीवरही तोडगा काढणार
केवळ हाताच्या त्रासावरच नव्हे, तर मासे आणि कोळंबीमुळे होणारी घाण आणि दुर्गंधी यावर सुद्धा उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन मंत्री राणे यांनी सभागृहात दिले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यापूर्वी, लवकरच कोळंबी सोलणाऱ्या आणि मासे विकणाऱ्या ताईंबरोबर बैठक घेऊन त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या जातील, असेही नितेश राणे यांनी यावेळी नमूद केले. या निर्णयामुळे किनारी भागात आणि मच्छीमारी व्यवसायात कार्यरत असलेल्या हजारो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.






