तांत्रिक अडथळे दूर होणार; खा. राजाभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
नाशिक : नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रातील लाखो रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी ऐतिहासिक घडामोड घडली. मनमाड–कसारा तसेच कसारा–मुंबई या मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईन निर्माण करण्यास केंद्र रेल्वे प्रशासनाने औपचारिक मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या नाशिक–मुंबई लोकल सेवा तसेच नवीन एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांच्या वाढीला गती मिळणार आहे.
नाशिक–मुंबई लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने, तसेच नवीन गाड्या वाढवण्याच्या मागणीवर रेल्वेकडून सतत “स्लॉट उपलब्ध नाहीत” हा अडथळा पुढे येत होता. या समस्येचे मूळ कारण सखोल अभ्यासातून ओळखून खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने केंद्र तसेच रेल्वे मंत्रालयासमोर स्वतंत्र नवीन रेल्वे लाईन उभारण्याची ठोस मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून मंत्रालयाने दोन्ही मार्गांवर दुहेरी लाईनला हिरवा कंदील दाखवला आहे.
सध्याच्या विद्यमान ट्रॅकवर वाढता ताण, मालगाड्यांची वाढती संख्या, सिग्नलिंगचे दडपण व अप-डाउन क्षमतेची मर्यादा यामुळे जनहिताच्या नवीन सेवांना मंजुरी देणे अशक्य झाले होते. नवीन लाईन मंजूर झाल्याने बाधित क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि नाशिक–मुंबई लोकल प्रकल्पास प्रत्यक्ष गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार वाजे यांनी गेल्या काही महिन्यांत मंत्रालयातील बैठका, लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न तसेच लेखी प्रस्तावांच्या माध्यमातून हा प्रश्न अत्यंत ठामपणे मांडला होता. रेल्वे प्रशासनाने दिलेली ही मंजुरी त्याच प्रयत्नांचे फळ असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. केंद्र सरकारकडून या मार्गावरील रेल्वेसेवेला मंजुरी मिळाल्याने स्थानिक भागातील रोजगार व व्यवसाय वृद्धीत भर पडणार आहे.
प्रकल्पाचे फायदे असे...
- नाशिक–मुंबई लोकल प्रकल्पाला प्रत्यक्ष गती
- एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढवणे सोपे
- लोकल सेवांसाठी आवश्यक स्लॉट निश्चित उपलब्ध
- मालगाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक निर्माण करण्याची सुविधा
- मुंबई–नाशिक–मनमाड रेल्वे वाहतूक आणखी वेगवान, सुरक्षित व वेळेवर
- उत्तर महाराष्ट्रासाठी रेल्वे सुविधांचा मोठा विस्तार





