परिसर अस्वच्छ करणाऱ्या ७८५ जणांवर कारवाई, सुमारे १२ लाखांचा दंड वसूल
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वायू निर्देशांक नियंत्रणात आणण्यासाठी बांधकामाचे डेब्रीजचे ट्रकमधून ओसंडून वाहून नेणे, परिसर स्वच्छ राखणे, कचरा जाळणे तसेच अनधिकृत डेब्रीज वाहून नेणे आदींबाबत कडक उपाययोजना केल्या जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्यावतीने कडक पाऊल उचलून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यानुसार परिसर स्वच्छ न राखणाऱ्यांकडून आतापर्यंत सुमारे सुमारे बारा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर अनधिकृत डेब्रीज ट्रकमधून वाहून नेणाऱ्यांविरोधात तब्बल साडे नऊ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्यावतीने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करणाऱ्यांविरोधात महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ आवेक्षक यांच्यावर क्लीन अप मार्शलकडून आकारल्या जाणाऱ्या दंडाची आकारणी करण्याचे जबाबदारी सोपवली आहे. मुंबईमध्ये अशाप्रकारे डेब्रीजसह कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ४५० कनिष्ठ आवेक्षकांची निवड केली असून या सर्वांवर रस्ता साफसफाईचे पालकत्व दिलेे आहे. मुंबई महापालिकेने अस्वच्छता तसेच डेब्रीज संदर्भात कारवाई करण्यासाठी क्लीन अप मार्शल नेमले होते. हे खासगी संस्थेचे क्लीन अप मार्शल बंद करून आपल्याच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ आवेक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमले आहे. त्यानुसार स्वच्छ आंगन अंतर्गत परिसर अस्वच्छ करणाऱ्यांसह, डेब्रीज ट्रकमधून झाकून न नेणे, अनधिकृत डेब्रीज वाहून नेणे तसेच टाकणे तसेच कचरा जाळणाऱ्यांविरोधात ही दंडात्मक कारवाई केली जाते.
स्वच्छ आंगन :
प्रकरणे : ७८५, दंड : ११.९५ लाख रुपये
डंपरमधून डेब्रीज झाकून न आणणे
प्रकरणे : २७, दंड : ४८ हजार ५०० रुपये
कचरा जाळणे
प्रकरणे : ५७, दंड : १८ हजार रुपये
अनधिकृत डेब्रीज टाकणे, वाहून नेणे
प्रकरणे : १४५, दंड : ९.६४ लाख रुपये






