Sunday, December 7, 2025

कोकणात मळभाचे सावट

कोकणात मळभाचे सावट

वार्तापत्र : कोकण

पूर्वी वर्षभरात कृषीची एक दैनंदीनी होती. आता तसे काही उरले नाही. धुक्यात रस्ते हरवतात. साहजिकच या वातावरणाचा परिणाम फळबागायतींवर दिसतो. यावर्षी आंबा, काजू पीक चांगले येईल अशी अपेक्षा कोकणातील बागायतदार शेतकरी बाळगून आहेत. आंबा, काजूंवर होणारी फवारणी, कीटकनाशक, खत, बागायतींची बेनावळ यावर हजारो रुपये खर्च होतात. कधी-कधी बागायतींवर होणाऱ्या खर्चाचे पैसेही मिळणाऱ्या उत्पन्नांतून होत नाहीत. कोकणात आंबा, काजू बागायतींमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यामुळे कोकणामध्ये वातावरणातील होणाऱ्या बदलाचे फार मोठे परिणाम होऊ शकतात. थंडी नाही, उन्हाळाही नाही असं आकाशात मळभ असलेल्या वातावरणाने सध्या कोकण ग्रासून गेले आहे.

कोकणात नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. थंडी कधी सुरू होणार या प्रतीक्षेत अवघं कोकण होतं. नोव्हेंबरमध्ये पाऊस असल्याने भातपिकाचं काय होणार याच चिंतेत कोकणातील शेतकरी होता; परंतु एकदाचा पाऊस थांबला तशी भातशेतीची कापणी आणि आणखी काही शेतींची कामे शेतकऱ्यांनी आटोपली, भातकापणी आणि भात भरून ठेवण्याचं शेतकऱ्याचं काम आटोपल असलं तरीही कोकणातील आंबा, काजू, जांभूळ, रतांबा बागायतदार शेतकरी चिंतेत आहेत. ऋतुचक्र बदललं आहे. वातावरणातील सतत घडणारे बदल. फळ उत्पादनावर संकट बनून आहेत. पहाटे थंडी, दुपारी कडक उन्हाळा असे विचित्र वातावरण आहे. एकीकडे ऋतुचक्रातील बदल वातावरण सतत बदलत राहिल्याने त्याचा विपरित परिणाम कोकणातील विविध फळपिकांवर होत आहेत. केवळ या वातावरण बदलाचा परिणाम फळपिकांवरच होतो असे नाही, तर कोकणातील मासेमारी व्यवसायावरही त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे. एकीकडे थंडी आहे असं म्हणता येत नाही किंवा थंडी झालीच नाही असेही म्हणता येणार नाही. या महिन्यात आंबा, काजू, रतांबा याला उत्तम मोहोर येतो. या आलेल्या मोहोरावर पूर्वी आंबा बागायतदार शेतकरी आणि आंबा कलम बाग कराराने घेतली जायची.

आंब्याच्या मोहोरावर आंबा बागेची बोली लागायची; परंतु गेल्या काही वर्षातील या हवामानाच्या बदलांमुळे आंबा बागायतदार आणि आंबा व्यावसायिक यांनी मोहोरावर आंबा किती येईल त्याचे किती पैसे होतील म्हणजे किती पेटी आंबे होतील असे सर्वच व्यवहार या बेभरवशामुळे आता होत नाहीत. याचे कारण मोहोर पाहून आंब्यांच्या झाडांची बोली करायची आणि मधल्या कालावधीत कोणत्यातरी रोगाने पीकच आले नाही तर सगळच बिघडायचं यामुळे पूर्वी सऱ्हास आंबा बागायतदार मोहोरावर आंब्याची बोली व्हायची ती आता फार कमी झाली. मोहोरावर बाग करायला घेण्यामध्ये बऱ्याचवेळा आंबा बागायतदार शेतकऱ्याचे नुकसान व्हायचे; परंतु हा सर्व मोहोरावरचा व्यवहार बोलीवर विश्वासावर चालायचा. काही व्यावसायिक आंब्याच्या झाडावरील मोहोर पाहून त्या आंब्याच्या झाडावर किती पेट्या आंबे मिळतील याचा अचूक अंदाज बांधणारे आंबा व्यवसायात मुरलेले व्यावसायिक होते. आजही आहेत. आजही मोहोरावर बाग देण्याचा आणि बाग घेण्याचा व्यावसायिक व्यवहार होत असतो; परंतु वातावरणातील सतत होणाऱ्या बदलांमुळे कोणालाच काही अंदाज वर्तवणे अवघड झाले आहे. एकीकडे थंडी येतेच म्हणेपर्यंत चार-दोन दिवसांतच थंडी गायब झाली आहे, तर दुसरीकडे मध्येच येणारी उष्णता यामुळे आंबा, काजू बागायतीचे पुढे काय होणार? याची चिंता आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना सतावत आहे.

कोकणातल अर्थकारण आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम या सर्व फळपिकांवर अवलंबून आहे. याबरोबरच मासेमारीचा व्यवसायदेखील अनियमित झाला आहे. या सर्वांचा परिणाम हा होतच असतो. अलीकडे काही दिवस दिवसभर ढगाळ वातावरण आहे. वातावरणातील हे बदल नेमके कसे आहेत त्याचा परिणाम कशा-कशावरती संभवतो हे सगळ ठरवणं, सांगणं कठीण आहे. काही वर्षांत वातावरणातील बदल सारच अनिश्चित करत आहे. पूर्वी वर्षभराच कृषीच शेड्युल होतं आता तस काही उरलं नाही. खूप बदललं. मध्येच दाट धूकं येतं; परंतु आता तर कोकणात पहाटेच्यावेळी अनेक मार्गांवर धूकं दिसतं. धुक्यात रस्ते हरवतात. साहजिकच या वातावरणाचा परिणाम फळबागायतींवर झालेला दिसतो. सध्याच्या या कोकणातील हिवाळ्यातल्या मळभ असणाऱ्या वातावरणाचाही मोठा परिणाम संभवतो. यावर्षी तरी आंबा, काजू पीक चांगलं येईल अशी अपेक्षा बाळगून कोकणातील बागायतदार शेतकरी आहे. आंबा, काजूंवर होणारी फवारणी, कीटकनाशक, खत, बागायतींची बेनावळ यावर हजारो रुपये खर्च होतात. कधी-कधी बागायतींवर होणार खर्चाचे पैसेही मिळणाऱ्या उत्पन्नांतून होत नाहीत; परंतु यावर्षी आंबा बागायतीमधून आंबा पीक कमी आलं, तर पुढच्यावर्षी जादाच पीक येईल अशी अपेक्षा ठेवून आंबा बागायतदार राबत असतो. कोकणात आंबा, काजू बागायतींमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यामुळे कोकणामध्ये वातावरणातील होणाऱ्या बदलाचे फार मोठे परिणाम होऊ शकतात. थंडी नाही, उन्हाळाही नाही असं आकाशात मळभ असलेलं वातावरण कोकणात आहे. हापूस आंबा म्हटल्यावर कोणालाही फक्त कोकणच आठवतं. गुजरात, कर्नाटक या राज्यातूनही आंबा पीक होतं. कोकणातील हापूस आंब्याशी स्पर्धा करण्यासाठी गुजरात, कर्नाटक राज्यातून आंबा आणला जातो. ‘हापूस आंबा’ म्हणून विक्री करण्याचा प्रयत्नही केला जातोय. एकीकडे निसर्गाचा बेभरवसा, त्याचं संकट त्यातच कमी म्हणून की काय कोकणातील आंबा आणि काजू व्यवसायातही परराज्यातून मोठ्या प्रमाणावर आंबा, काजू आणून बाजारात विक्रीला आणण्याचा प्रयत्न होताना दिसतो. कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांनी सावध असण्याची आवश्यकता आहे.

कोकणात सर्वच बाजूने स्पर्धा आहे. आजकाल कोकणातील हापूस आंबा बाजारात येण्यापूर्वी कर्नाटकातील आंबा कोकणातील हमरस्त्यावर येत असतो. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना कर्नाटकचा हा बाजारात येणारा आंबा हा कोकणचा हापूस म्हणून विक्री करणारेही अनेक आहेत. या कर्नाटक आंबा विक्रीमध्ये आंबा पॅक करताना कोकणातील मराठी दैनिकांचा कागद आंबा पेटी पॅकिंगमध्ये वापरला जातो. जेणेकरून कर्नाटकचा तो आंबा कोकणातलाच आंबा आहे असे वाटण्यासाठी आंबा पेटी पॅकिंगमध्ये कोकणातील स्थानिक वृत्तपत्रांचा रद्दी कागद वापरला जातो. मार्केटमध्ये फसवणुकीचा कसा फंडा वापरला जातो त्याचे हे एक-एक नमुनेदार उदाहरण आहेत.

मुंबईच्या बाजारातही गुजरात, कर्नाटकचे आंबे कोकणचा हापूस म्हणून विकण्याचा प्रयत्न होतो. आता तर वलसाडच्या हापूसने आपल्या मानांकनासाठी स्पर्धा सुरू केली आहे. पण ज्यांनी कोकणच्या हापूसचा स्वादिष्टपणा चाखलेला आहे त्याला कोकणातील हापूस आंब्याच्या वासावरूनही आंबा कोकणचा आहे की बनवेगीरी आहे हे समजून येते. कोकणच्या हापूसची बरोबरी इतर कोणत्या राज्यातील आंब्याला करता येणारी नाही. कोकणातील हापूस त्यांचा रंग, त्याचे देखणेपण, त्याचा स्वाद आणि सगळंच कुठेच सापडणार नाही; परंतु ऋतुचक्र आणि हवामानातील बदलाच्या परिणामांच्या कचाट्यात मात्र कोकणचा हापूस, काजू सारेच सापडलेय यामुळेच कोकणातील बागायतदार चिंतातूर आहेत.

- संतोष वायंगणकर

Comments
Add Comment