Sunday, December 7, 2025

चक्राकार उपाय नकोत!

चक्राकार उपाय नकोत!

वाघ जितका गरजेचा आहे तितकाच माणूसही. गावाकडचा सर्वसामान्य माणूस प्रचंड तणावात जगतोय. शेतकरी, मजूर, आदिवासी बांधव त्यांच्या शेतात अगदी घरात वाघ किंवा बिबट्याचा प्रवेश होतो आहे. एका रात्रीत आयुष्याची कमाई नष्ट होते. प्रियजना गमावले जातात हे दुःख शब्दात मावणारे नाही. नुसतं दुःख व्यक्त करून चालणार नाही. आज ग्रामीण भागातले वास्तव खूप भयावह आहे. माणूस निसर्गाचा भाग आहे, पण त्यांना जगण्याचा हक्क आहे. काही गोष्टी फार काळ लावून धरून चालणार नाहीत. कारण मानवजातीवर त्याचे प्रचंड दुष्परिणाम होत आहेत. गेले दोन वर्षं डॉक्टर नामदेव गुंजाळ यावर भरपूर संशोधन करत आहेत. त्यांच्या मते वाघाचे संरक्षण केलेच पाहिजे. त्याला खायला-प्यायला भरपूर दिले पाहिजे. तो त्याचा नैसर्गिक हक्क आहे; परंतु त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेवर होऊ नये यात कुणीही राजकारण आणू नये. हे मानवतेचे निसर्गाच्या संतुलनाचे आणि भावी पिढ्यांचा प्रश्न आहे. वाघ आणि माणूस दोघे निसर्गाचे अपत्य आहेत. संरक्षण आणि सहजीवन हाच खरा मार्ग आहे.

या बिबट्याच्या दहशतीमुळे आज ग्रामीण भागातील समाज एक अस्वस्थ करणाऱ्या सत्याशी झुंजत आहे. रात्रीच्या निरव शांततेत अचानक येणारा बिबट्याचा ओरडा, घराबाहेर पडण्याची भीती आणि सततच्या धास्तीने ग्रामीण जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत खरे, पण त्याहून मोठी समस्या आहे ती मानवी जीवनावर झालेल्या खोलवर परिणामांची. हा फक्त प्राण्यांचा आणि माणसांचा संघर्ष नाही, ही एक संपूर्ण ग्रामीण संस्कृतीवर, अर्थव्यवस्थेवर आणि भावी पिढीच्या भविष्यावर आलेली संकटाची छाया आहे. त्यावर तात्पुरती सोय न करता कायमस्वरूपी उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात त्याचे मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावे लागतील ही आजची वस्तुस्थिती आहे. आज बिबट्यांच्या भीतीने गाई, म्हशी देखील तणावग्रस्त झाल्या आहेत.

बिबट्या परिसरात फिरत असल्याचे जाणवले की जनावरे दूध देणे कमी करतात. त्यांच्या मनात भीती निर्माण होते. दूध उत्पादन घटते आणि शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. एका रात्रीतच कुटुंबाची अर्थव्यवस्था डळमळीत होते. घरात शौचालय नसल्याने रात्री बाहेर जाण्याची मजबुरी आणि त्याच वेळेला बिबट्याची भीती यामुळे ग्रामीण बांधव अक्षरशः कैद झाले आहेत. लहान मुले, वृद्ध स्त्रिया सगळेच रात्री घराबाहेर पडायला घाबरतात. लघवी, शौच दाबून ठेवावे लागते. याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. मूत्रमार्गाचे आजार, पोटाचे विकार वाढले आहेत. भीती आणि शारीरिक त्रास यांचा दुहेरी मार बसत आहे. भीती आणि मानसिक त्रास यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारण लहान-मोठ्यांची झोपच उडाली आहे. झोप न आल्यामुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे. शिक्षण क्षेत्र तर पूर्णपणे कोलमडले आहे. शाळा महाविद्यालयांच्या गेटवर मोठे फलक लागले आहेत. 'सूर्यास्तानंतर शाळा बंद'. परिणामी ग्रामीण मुले स्पर्धा परीक्षेत मागे पडत आहेत. त्यांचे भविष्य अंधकारमय होत चालले आहे. मनावर सतत भीतीचे दडपण असल्याने अभ्यासाकडे मन लागत नाही. भीतीने मनावर सतत दबाव असतो. यामुळे शाळेतील मुलांचा अभ्यास असो किंवा कुठलेही काम मनमोकळेपणाने होत नाही. ऊस तोडणी कामगारांच्या जीवनात ही भीती घर करून आहे. 'टोळीने काम करा' असे सांगितले जाते पण घरात लहान मुलं असताना टोळीन एकत्र काम करणे शक्यच नाही. बिबट्याची भीती आणि मुलांची काळजी यामुळे कामाचा वेग मंदावतो. गाळप क्षेत्र कमी होते, साखर कारखाने तोट्यात जातात. एका संपूर्ण उद्योगावर परिणाम होतो. रात्रीच्या प्रवासाचा प्रश्न तर आणखीन गंभीर आहे. आजारी पडले, की दवाखान्यात नेणे कठीण होते. प्रसूतीच्या वेदना असोत किंवा हृदयविकाराचा झटका असो रात्री रस्त्यावर पडणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे असते. आतापर्यंत अनेक जीव या भीतीमुळे गेले आहेत आणि जात राहतील. सरकार तात्पुरते उपाय सांगते. हातात काठी घेऊन फिरा, बॅटरी घेऊन फिरा, गळ्याभोवती कॉलर टोन लावा, फटाके फोडा पण हे उपाय व्यावसायिक नाहीत. काम करताना कॉलर कसे लावणार? बिबट्या काय सांगून येत नाही. ऊसतोड करताना हे शक्य आहे का? ही तात्पुरती मलमपट्टी आहे. कायमची नाही. त्यांना हवी आहे कायमस्वरूपी सोडवणूक आणि ती शक्य आहे. या प्रश्नावर काम करणारे नामदेव गुंजाळ यांनी सरकारकडे तसा प्रस्तावही ठेवला आहे. बिबट्यांना नैसर्गिक अधिवासाकडे परत नेणे, कॉरिडॉरचे संरक्षण करणे हे सगळे शास्त्रज्ञ आणि यशस्वी उपाय आहेत. नुकताच त्यांनी जुन्नर तालुक्यात अशाच पद्धतीने बिबट्यांचे स्थलांतर केल्यावर हल्ले कमी झाल्याचे उदाहरणासह दाखवून दिले. आज ग्रामीण भागातील प्रत्येक माणूस, प्रत्येक लहान मूल, गाय, म्हैस अगदी शेतातील प्राणी बिबट्याच्या भीतीपोटी कैद आहेत. ही कैद फोडायची असेल, तर तात्पुरते उपाय नव्हे तर कायमस्वरूपी उपायोजना हवी. नामदेव गुंजाळ यांच्यासारख्या व्यक्ती संस्थाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. स्थानिक जनता तयार आहे मदत करण्यास. फक्त सरकारने पुढाकार घेऊन या संस्थांच्या सहकार्याने ठोस योजना आखली तर प्रश्न कायमचा संपुष्टात येऊ शकतो. ग्रामीण महाराष्ट्राला पुन्हा एकदा निर्भय रात्री हव्या आहेत. मुलांना पुन्हा अभ्यासाबरोबर मुक्त संचार हवा आहे. ग्रामीण भागाबरोबरच आता शहरी भागातही बिबट्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या शांततेत कधीकाळी फक्त कुत्र्यांचे भुंकणे ऐकू यायचे. आता त्यात मिसळतो एक वेगळाच आवाज. बिबट्याचा गुरकावण्याचा तो आवाज ऐकला की मनात धडकी भरते. कारण तो फक्त आवाज नाही ते एक संकट आहे. ते हळूहळू आपल्या दारापर्यंत येऊन ठेपले आहे. काही वर्षांपूर्वी बिबट्याचे नाव ऐकले की डोळ्यांसमोर यायचे ते गावाकडच्या जनतेची हालत. ऊस तोडणी करणारे मजूर रात्री गावाबाहेर पडण्यास घाबरायचे. आज तो बिबट्या शहरात देखील आला आहे. तो भल्या पहाटे मॉर्निंग वॉक करताना दिसतो. कारण पुणे-मुंबई शहरातच नव्हे, तर इतरही शहरात बिबट्याचे अधून-मधून दर्शन घडत असते. मुंबईकरांनाही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ठाणे, मुलुंड, बोरिवली, आरेसारख्या ठिकाणी रात्री बिबटे दिसण्याच्या घटना घडल्या आहेत.

बिबट्या पहाटे हल्ला करतो. तो रात्री अपार्टमेंटच्या कंपाउंडमध्ये कुत्र्यावर हल्ला करताना दिसतो. आता बिबट्या फक्त जंगलाचा रहिवासी राहिला नाही, तो आपल्या शहरातही शेजारी आलेला आहे. पहाटे उठून फिरायला जायचे. स्वप्न जे आता स्वप्नवत वाटायला लागले आहे. बिबट्या पकडणे, त्यांना बेशुद्ध करणे, दुसऱ्या जंगलात सोडणे पण हा काय पर्याय आहे का? बिबट्या परत येतोच तो उपाशी कसा राहील? कोणत्याही प्राणी उपजीविकेसाठी लढतो आणि बिबट्या तर जंगलाचा राजा आहे, पण हाच राजा गावांचा शत्रू बनला आहे. वनखात्याचा मोठा वेळ, शासनाचा पैसा, अधिकाऱ्यांची मेहनत सगळं वाघ सांभाळण्यात जातंय. त्यांना पुरेसे अधिकार नाहीत. तर ते जनतेसमोर उभे राहतात, टीका सहन करतात आणि जनता तर दहशतीने ग्रासलेली आहे. ही दहशत अतिशय भयानक आहे. खरं म्हणजे जंगलाचे क्षेत्रफळ आता कमी होत चाललंय. मानवी वस्ती वाढत आहे. वाघांचे कॉरिडोर तुटलेत. भक्ष कमी झालाय पण यावर मलमपट्टी करून चालणार नाही. वरच्यावर आश्वासने देऊन तात्पुरते उपाय करून उपयोग नाही. ठोस निर्णय घेतला पाहिजे.बिबट्या पकडून सोडणे हा चक्राकार उपाय थांबवला पाहिजे. त्या ऐवजी नियमात बदल केले पाहिजेत. वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा आणली पाहिजे. संघर्षग्रस्त भागात बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने परवानगी दिली पाहिजे. बिबट्या मारणे नव्हे पण नियोजित स्थलांतर किंवा इको फ्रेंडली बॅरियर्स. जंगल विस्तार आणि कॉरिडॉर मानवी वस्तीपासून दूर नवीन जंगले विकसित केली पाहिजेत. त्यांचे भक्ष्य वाढवले पाहिजेत. शासनाचा पैसा यात गुंतला पाहिजे. जेणेकरून वनखात्याची धावपळ कमी होईल व अमूल्य जीवही वाचतील. जनजागृती करून आणि भरपाई करून पीडितांना तत्काळ पुरेशी भरपाई दिली पाहिजे. गावकऱ्यांना वाघप्रूफ फेसिंग. सोलार लाईट्स पुरवले पाहिजेत. हे सगळं तात्पुरते मूलभूत बदल हवे आहेत. मानव, बिबट्या संघर्ष आता अधिकच वाढत चालला आहे तो लपवून चालणार नाही. बिबट्या जंगलाचा राजा आहे. तो राजाच राहिला पाहिजे आणि मानव गावातला राजा. दोघांचाही हक्क जपला पाहिजे, त्यासाठी ठोस निर्णय आता घ्यावे लागेल. अन्यथा ही दहशत हा रक्तपात कधीच थांबणार नाही.

- अल्पेश म्हात्रे

Comments
Add Comment