Monday, December 8, 2025

भारत विरुद्ध द. आफ्रिका टी-२० चा रणसंग्राम!

भारत विरुद्ध द. आफ्रिका टी-२० चा रणसंग्राम!

कटक’मध्ये पहिला सामना; ‘अहमदाबाद’मध्ये अंतिम लढत

मुंबई : के. एल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेला २-१ ने धूळ चारल्यानंतर, आता भारतीय क्रिकेट संघ टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत त्यांच्याशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही ५ सामन्यांची मालिका ९ डिसेंबरपासून कटक येथील सामन्याने सुरू होणार आहे.

एकदिवसीय मालिकेत विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी शानदार शतके झळकावून भारतीय संघासाठी दमदार प्रदर्शन केले. आता टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा 'मिस्टर ३६०' अर्थात सूर्यकुमार यादव संघाची धुरा सांभाळणार आहे, तर आफ्रिकेची कमान एडन माक्ररम याच्या हाती असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजक ठरणार आहे. दोन्ही संघात असे अनेक स्टार खेळाडू आहेत, जे काही चेंडूंमध्येच सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता ठेवतात. टी-२० क्रिकेटचे हे महारथी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक आहेत. ९ डिसेंबर रोजी कटकच्या मैदानावर मालिकेचा पहिला टी-२० सामना रंगणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ ११ डिसेंबरला न्यू चंदीगडमध्ये दाखल होतील. मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरला धर्मशाला येथील नयनरम्य मैदानात खेळला जाईल.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेतही दमदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर हरवल्यानंतर, टीम इंडिया प्रोटीजविरुद्ध हीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार ‘सूर्या’ पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणकोणत्या अकरा खेळाडूंना संधी देऊ शकतो हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र भारतीय संघासाठी चांगली बाब म्हणजे गिल दुखापतीतून सावरला आहे आणि तो संपूर्ण मालिकेत फलंदाजी करताना दिसेल. गिल, अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी खुद्द कर्णधार सूर्यकुमार यादव घेऊ शकतो, तर चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा खेळताना दिसण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनला पुन्हा एकदा मधल्या फळीत फलंदाजी करावी लागेल. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आपल्या आक्रमक फलंदाजीने वर्चस्व गाजवू शकतो. भारतीय संघ अक्षर पटेलकडून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने जबरदस्त कामगिरीची अपेक्षा करेल. टी-२० मालिकेत जसप्रीत बुमराह आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांची परीक्षा घेताना दिसणार आहे. बुमराहच्या पुनरागमनामुळे अर्शदीप सिंगला बाहेर बसावे लागू शकते. बुमराहला हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे गोलंदाजीत साथ देतील. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप आणि वरुण चक्रवर्ती यांच्या हातात असेल आणि कुलदीप-वरुणला अक्षर पटेलची साथ मिळेल.

...असे आहेत संभाव्य संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.

दक्षिण आफ्रिका : एडन माक्ररम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डोनोवन फरेरा, रीजा हेंड्रिक्स, मार्को जेनसन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, लुथो सिपामला आणि ट्रिस्टन स्टब्स.

भारत विरुद्ध द आफ्रिका टी-२० मालिकेचे वेळापत्रक :
  • पहिला टी-२० सामना : ९ डिसेंबर : कटक
  • दुसरा टी-२० सामना : ११ डिसेंबर : चंदीगड
  • तिसरा टी-२० सामना : १४ डिसेंबर : धर्मशाला
  • चौथा टी-२० सामना : १७ डिसेंबर : लखनऊ
  • पाचवा टी-२० सामना : १९ डिसेंबर : अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
Comments
Add Comment