नागपूर : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. आता २० डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू आहे. या वातावरणातच जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार हे अधिवेशन जेमतेम आठवडाभर असेल. अधिवेशनाची सुरुवात सोमवार ८ डिसेंबर रोजी होईल.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला विविध मुद्यांवर घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, मुंढव्यातील बेकायदा जमीन खरेदीचा व्यवहार, कथित सिडको जमीन घोटाळा, डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असतील. तर सरकार या प्रकरणांमध्ये स्वतःची बाजू मांडेल तसेच महत्त्वाच्या विषयांवर विधिमंडळात सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करेल. विरोधक अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन कदाचित अधिवेशनाचा सर्वाधिक काळ खर्ची जाण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबरच्या मतदानाला जेमतेम ४८ तास उरले असताना निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल केला. या मुद्यावर विधिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. मतदार यादी, मतदारसंघांचे वाटप या मुद्यांवरुन सभागृहात वातावरण तापण्याची शक्यता आहे.
यंदा पहिल्यांदाच विधानसभेत आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेताच नसल्यामुळे विरोधकांचे नेतृत्व कोण करणार याविषयी उत्सुकता आहे. 'इंडिगो'च्या गोंधळामुळे किती नेते वेळेत पोहोचणार याविषयी संभ्रम आहे. चहापानावेळी किती नेते नागपूरमध्ये असतील हे अद्याप समजलेले नाही. पण मागील काही अधिवेशनांच्या वेळी घडलेल्या घटना बघता शासकीय चहापानावर विरोधक बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.
राज्यात विरोधी पक्षनेता नसल्याने कोणालाही विरोधी पक्षनेत्याचा बंगला दिलेला नाही. नागपूरमध्ये विरोधकांची पत्रकार परिषद काँग्रेसच्या कार्यालयात होणार असल्याचे वृत्त आहे.