पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत किमान २५ लोक ठार झाले, तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संबंधित नाइट क्लबला सील, तर क्लबच्या मालकांसह ४ जणांवर गुन्हा दाखल झाला असून मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. तसेच, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आग लागली तेव्हा डान्स फ्लोअरवर १०० ते १५०लोक होते. बॅले डान्स सुरु असतानाच आगीच्या ज्वाळा छतावरुन कोसळू लागल्या. पुढच्या दहा मिनीटात सर्वत्र आग भडकली. घाबरून अनेक जण खाली पळाले,तो मार्ग तळघरात स्वयंपाकगृहात जाणारा होता. जिथे अगोदरच काही कर्मचारी अडकले होते. बहुतेक बळी आगीमुळे भाजून नाही,तर दाट धुरामुळे झालेल्या गुदमरल्यामुळे मरण पावले. फक्त तिघांचा मृत्यू भाजल्यामुळे झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की बळी पडलेल्यांपैकी बहुतेक स्वयंपाकघरातील कर्मचारी होते; मृतांमध्ये तीन महिला आणि अनेक पर्यटकांचा समावेश आहे.
बिर्च येथील सुरक्षा रक्षक संजय कुमार गुप्ता यांच्या मते, ही घटना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडली. "मी गेटवर होतो तेव्हा अचानक आग लागली. एक डीजे आणि नर्तक येणार होते आणि गर्दी वाढणार होती." हैदराबादच्या फातिमा शेख म्हणाल्या की, लोक जीव वाचवण्यासाठी स्वयंपाकघरात धावले, परंतु त्यांना माहित नव्हते की प्रवेशद्वार बंद आहे.
अरुंद रस्त्यांमुळे बचाव कार्यात अडथळा
नारळाच्या पानांपासून बनवलेल्या तात्पुरत्या सजावटीमुळे आगीत आणखी वाढ झाली. अरुंद रस्ते आणि क्लबचे बॅकवॉटरजवळील स्थानामुळे, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळापासून ४०० मीटर अंतरावर अडकल्या, ज्यामुळे बचाव कार्यात विलंब झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की प्रवेशाअभावी परिस्थिती आणखी भयानक बनली.
सुरुवातीला गॅस सिलिंडर स्फोटाचा संशय होता, पण नंतर पोलीस महासंचालकांनी तपासणीनंतर सिलिंडर स्फोटाची शक्यता नाकारली कारण सिलिंडर शाबूत आढळले.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आगीची सुरुवात पहिल्या मजल्यावरील डान्स एरियामध्ये झाली. एका बॅले डान्सच्या परफॉर्मन्सदरम्यान फटाके उडवण्यात आले, जे तिथे लावलेल्या बांबू आणि फायबरसारख्या अत्यंत ज्वलनशील तात्पुरत्या सजावटीच्या संपर्कात आले आणि आग लागली.
पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि जखमींबाबत विचारपूस केली. पीएमओने जाहीर केलेल्या अनुदानानुसार, मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये दिले जातील.






