इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून पाकिस्तानमधील चमन आणि अफगाणिस्तानमधील स्पिन बोल्डक या सीमाभागात दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांमध्ये तुफान गोळीबार झाला. यात अनेक मोटारचे गोळे एकमेकांच्या दिशेने फायर करण्यात आले. काही आधुनिक शस्त्रांचा देखील वापर करण्यात आला. यामुळे सीमाभागात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये सौदी अरेबिया इथं शांततेबाबत चर्चा सुरू होती. ही चर्चा फिसकटल्यानंतर सीमेवर हा गोळीबार सुरू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील स्पिन बोल्डकमधून पाकिस्तानच्या दिशेने फायरिंग झालं तर पाकिस्तानच्या चमनकडून अफगाणिस्तानच्या दिशेला फायरिंग झालं. सतत होणाऱ्या या फायरिंगमुळे दोन्ही देशातील शेकडो कुटुंबे आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थान पळू लागले. स्थानिकांना त्यांचे सामान गोळा करण्याची देखील संधी मिळाली नाही. दिलासादायक बाब म्हणजे या गोळीबारात कोणाचा मृत्यू झाल्याची सध्या वृत्त नाही. मात्र सीमेवर स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. नेहमीप्रमाणे अफगाणिस्ताननं पाकिस्तानला अन् पाकिस्ताननं अफगाणिस्तानला या संघर्षाला जबाबदार धरलं आहे. अफगाण तालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी कंधारच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यात पहिल्यांदा हल्ला केला. त्यामुळं इस्लामिक अमिरातच्या सुरक्षा दलांना त्याचे प्रत्युत्त देणे भाग पडले. दुसरीकडं पाकिस्तान सराकरनं अफगाणिस्तानचे आरोप फेटाळून लावले. पाकिस्तान प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रवक्ते मोशर्फ जैदी यांनी अफगाण सुरक्षा दलांनी सीमेवर येत कारण नसताना गोळीबार केला. त्यांच्या या कृतीनंतर पाकिस्ताननं आपली क्षेत्रीय संप्रभुता आणि आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली.






