मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत झालेल्या बिघाडामुळे विमान कंपनीने अनेक उड्डाणे रद्द केली असून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.देशातील प्रत्येक विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ उडालेला पहायला मिळत आहे. विमान रद्द झाल्यामुळे आणि विमान उशीर उड्डाण घेणार या बिनभरोसे कामकाजावर नाराजी व्यक्त करत तिकिटाची परतफेड करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यावर इंडिगोने महत्त्वाची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून इंडिगोचे अनेक उड्डाणे रद्द केली जात असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली आहे. तसेच ही परिस्थिती एका रात्रीत सुटणार नसून लवकरात लवकर सर्व विमान सेवा पूर्ववत करण्यासाठी पथके काम करत आहेत, अशी महत्त्वाची माहिती इंडिगोने दिली आहे. दरम्यान सर्व रद्दीकरणांसाठी पूर्ण परतफेड स्वयंचलितपणे मूळ पेमेंट पद्धतीवर केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत इंडिगोने द्विटरवर पोस्ट केली असून त्यामध्ये, इंडिगोने कबूल केले की अनेक प्रवाशांना रद्दीकरण, विमानतळांवर दीर्घ प्रतीक्षा वेळ आणि मर्यादित माहितीचा सामना करावा लागला. मात्र शनिवारपासून हळूहळू सुधारणा करण्यासाठी सर्व सिस्टम आणि वेळापत्रक रीबूट करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
We are sorry 🙏 pic.twitter.com/8DmY2rJrjR
— IndiGo (@IndiGo6E) December 5, 2025
एअरलाइनकडून बाधित प्रवाशांसाठी उपाययोजना जाहीर
- सर्व रद्दीकरणांसाठी पूर्ण परतफेड स्वयंचलितपणे मूळ पेमेंट पद्धतीवर केली जाईल.
- ५ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान बुकिंगसाठी रद्दीकरण आणि रीशेड्युलिंग शुल्कावर पूर्ण माफी.
- प्रवाशांसाठी शहरांमधील हॉटेल रूम आणि वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.
- विमानतळांवर जेवण आणि नाश्ता दिला जात आहे.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी शक्य असेल तिथे लाउंज अक्सेसची व्यवस्था केली जात आहे.






