मुंबई : डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दीड हजार रुपये नव्हे, तर तीन हजार रूपये जमा होणार आहेत. डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली असली तरी, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नोव्हेंबरचा हप्ता अजून जमा झालेला नाही. राज्य सरकार या महिन्यातील आणि मागील महिन्यातील असे दोन हप्ते मिळून एकूण ३ हजारची रक्कम एकाच वेळी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करू शकते. जर हा अंदाज खरा ठरला, तर राज्यातील लाखो महिलांना एकाच वेळी ३ हजार आर्थिक मदत मिळणार आहे.
नोव्हेंबरचा हप्ता जारी न होण्यामागे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रमुख कारण असू शकते. यापूर्वी, राज्यात विधानसभा निवडणुकांदरम्यान देखील योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी पाठवण्यात आले होते. त्यामुळे, यावेळी देखील निवडणुकांमुळे हप्ता जमा होण्यास विलंब होत असावा आणि दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळतील, असा अंदाज आहे. पुढील आठवड्यापर्यंत सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करू शकते, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, सरकारने स्पष्ट केले आहे की जर लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यात दोन महिन्याचा एकत्रित हप्ता मिळावा यासाठी मंत्रालयीन पातळीवरून प्रयत्न सुरू झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.