सोमवारी, ८ डिसेंबरला पाच दिवसाच्या यात्रेचा होणार समारोप
अलिबाग : चौलच्या पर्वतवासी श्रीदत्तात्रेय देवस्थानच्या पाचदिवसीय यात्रेला श्री दत्तजयंतीपासून ४ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, या यात्रेसाठी रायगडसह मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी भागातून भाविक येण्याची शक्यता असल्याने या पाचदिवसीय यात्रेत लाखोंची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी ८ डिसेंबरला या पाचदिवसीय यात्रेचा समारोप होणार आहे.
इतिहास काळात विदेश व्यापारांशी संलग्न असलेल्या चौल चंपावती नगरीत प्रसिद्ध अशी ३६० मंदिरांची नोंद सापडते. चौल रामेश्वर, चौल शितळादेवी, हिंगुळजा देवी, मुखरी गणपती, महालक्ष्मी, चंपावतीदेवी, चौल कुंडेश्वर मंदिर, रेवदंडा हरेश्वर मंदिर, रेवदंडा मारूती मंदिर आदी मंदिरे अद्यापी इतिहासाची साक्षीदार आहेत, त्यापैकीच चौलचे भोवाळे येथील पर्वतवासी श्रीदत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान होय. चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.
या यात्रेला रायगड जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे या भागांतून असंख्य भाविक यात्रेच्या पाच दिवसात उपस्थिती लावत श्रीदत्तात्रेयाचे दर्शन घेण्याबरोबरच यात्रेचा मनमुराद आनंद लुटत असतात. या वर्षातील ही अलिबाग तालुक्यातील शेवटची यात्रा असून, हा दत्त नवसाला पावतो व त्याच्या दर्शनाने भाविकांच्या अडीअडचणीचे निवारण होते अशी लोकांची श्रध्दा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी नगरीतील पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजापैकी मुंबईत राहणाऱ्या मंडळीनी सुमारे ४० ते ६० वर्षापूर्वी तयार केलेला चांदीचा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून वाजतगाजत श्रीदत्त मंदिरात आणला जातो. मुळ दत्तमूर्तीची यथासांग पुजा करून हा मुखवटा मुळ दत्तमूर्तीला लावला जातो. यात्रेपूर्वी श्रीदत्त मंदिरात सात दिवस सप्ताह चालतो.
हे मंदिर पुरातन नसले तरी ऐतिहासिक निश्चितच आहे. कारण आग्रेंच्या उत्तरकालीन इतिहासात या दत्तमंदिराचा उल्लेख वरचेवर आढळतो, तसेच आंग्रे घराण्यातील पुरूषांची या पर्वतवासी दत्तावर अतिशय श्रध्दा होती असे समजले.
चौलला येण्यासाठी खासगी वाहनाने वडखळ, पोयनाड, अलिबाग, नागावमार्गे चौलला येता येते. एसटीने आल्यास बोरिवली-रेवदंडा या एसटीने किंवा गेटवे ऑफ इंडिया येथून पीएनपी, अंजठा, पीएनपीने लॉचने मांडवा (अलिबाग) आल्यानंतर त्यांच्या खासगी बसने अलिबागला आल्यानंतर अलिबाग-रेवदंडा एसटीने, तसेच खासगी रिक्षाने चौल नाका येथे उतरून यात्रेच्या ठिकाणी पायी जाता येते. चौलमध्ये राहावयाचे झाल्यास या परिसरात लॉजिंग-बोर्डीगची सोय आहे. उपहारगृहेही आहेत.