मुंबई : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी साईबाबांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तेव्हाच्या आणि नंतर आलेल्या पिढ्यांनाही प्रेरणा देणारा ठरला.
८६ वर्षीय सुधीर दळवी सध्या एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून ते ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे त्यांना शिर्डी संस्थानाकडून ११ लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अभिनेते सुधीर दळवी यांना आर्थिक अडचण असल्याचे लक्षात येताच श्री साई बाबा संस्थान ट्रस्टने (शिर्डी) त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संस्थेच्या वतीने नियमात बदल करून त्यांना मदत करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने ११ लाख रुपयांची मदत देण्यास हिरवा झेंडा दाखवला.
न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन एस वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत म्हटले, लोकांची श्रद्धा आणि ज्येष्ठ अभिनेत्याने साकारलेली भूमिका पाहता. ट्रस्ट त्यांना आर्थिक मदत देऊ शकते. श्री साई बाबांनी आयुष्यभर इतरांना मदत केली होती.
त्यांच्या आयुष्याचा सार पाहता ही मदत योग्य आहे. खंडपीठाने म्हटले की, ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना आर्थिक मदत हवी असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या उपचारासाठी ११ लाख रुपये देण्यास आम्ही संस्थेला परवानगी देण्यात आली असून श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी), कायदा २००४ च्या कलम १७ (२) (२) (ओ) च्या तरतुदीनुसार ही मदत मानवी कल्याणाच्या उद्देशाने देण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.