Friday, December 5, 2025

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूक

भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका सोसायटीत मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे, असा आरोप एका तरुणाने केला. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. सतत मराठी-अमराठी वाद निर्माण होत आहे. भाईंदर प., येथील स्कायलाईन या सोसायटीत घर खरेदी करण्यास गेलेल्या रवींद्र खरात नामक युवकाने हे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांनुसार, ते फ्लॅटची माहिती घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना स्पष्ट सांगण्यात आले की, येथे फक्त जैन, मारवाडी किंवा ब्राह्मण समाजातील लोकांनाच फ्लॅट दिले जातील. खरात यांनी म्हटले की, "आम्ही मराठी, नॉनव्हेज खातो आणि आमची जात ब्राह्मण, जैन किंवा मारवाडी नसेल, तर आम्हाला फ्लॅट दिला जाऊ शकत नाही, असे तिथे स्पष्टपणे सांगण्यात आले." संबंधित बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी खरात यांनी केली आहे.

संबंधित बांधकाम व्यावसायिक हा जैन समाजाचा आहे. तो फक्त जैन बांधवांसाठीच इमारती बांधणार आहे का? स्थानिक आमदार आणि बांधकाम व्यावसायिकदेखील जैन असल्याने भाईंदरमध्ये मराठी माणसाला डावलले जात आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हक्काची आणि भाषेची गळचेपी सुरू आहे," असा संताप या प्रकरणी व्यक्त होत आहे. काँग्रेसने संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या प्रोजेक्टवर स्टिंग ऑपरेशन करून हे धक्कादायक वास्तव उघड केल्याचा दावा केला आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बिल्डरची माणसे मराठी माण्साला फ्लॅट देण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे. "या पट्ट्यामध्ये ८५ टक्के गुजराती, मारवाडी लोक आहेत. कोणाशीही बोलून फायदा नाही. बिल्डरसुद्धा जैन आहे," असे प्रकल्पाचा प्रतिनिधी बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Comments
Add Comment