पुतिन भेटीतील ‘अर्थ’

तिन यांच्या भारत भेटीची आज जागतिक पातळीवर चर्चा होत असली तरी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात आले आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हा पहिला दौरा आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसाठी भारताच्या राष्ट्रपती मेजवानीचे आयोजन करतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यापूर्वी २०२१ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी २१व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थिती लावली होती.


कोणत्याही बलाढ्य राष्ट्राचे प्रमुख आपल्या देशामध्ये भेटीस आल्यावर त्यांच्या कार्याची, खासगी आयुष्याची, मालमत्तेची, राहणीमानाची प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा होणे स्वाभाविकच असते. कोणीही राष्ट्राध्यक्ष अथवा त्या त्या देशांचे पंतप्रधान भारत भेटीवर आल्यास आपल्या देशासोबत त्यांचे विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीचे करार होतात, उद्योगधंद्याची, शस्त्रांची देवाणघेवाण, खरेदीविक्री होते. पण, अन्य देशाचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान येणे व रशियाचे राष्ट्रपती आपल्या देशात येणे यात फरक आहे.


स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताचे आणि रशियाचे मित्रत्वाचे संबंध आहेत. सुबत्तेच्या तसेच पडझडीच्या काळातही दोन्ही देशांच्या मैत्रीमध्ये खंड पडलेला नाही. शेजारील राष्ट्र पाकिस्तान सातत्याने आपल्याला त्रास देत असताना, आपल्या कुरापती काढत असताना, आपल्या देशात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असताना अमेरिकेने सातत्याने पाकिस्तानची पाठराखण केली आहे. त्यावेळी रशियाने आपल्यामागे उभे राहत खऱ्या मित्राची भूमिका जागतिक पातळीवर निभावली आहे. भारत-रशिया मैत्रीमुळेच अमेरिकेचा पूर्वीपासूनच तिळपापड झाला आहे. त्यातूनच अमेरिकेने आपल्यावर वाढीव आयात शुल्काचा(टॅरिफ) भुर्दंड लादलेला आहे. खनिज तेलाची खरेदी हे तर केवळ निमित्त आहे. भारतातील कंपन्या रशियाकडून तेलखरेदी करत असल्याच्या प्रकाराला अमेरिकेचा आक्षेप आहे. त्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेळोवेळी आकांडतांडवही करत भारतविरोधी संताप व्यक्त करत आहेत. आपल्या देशात आलेल्या परदेशातील पंतप्रधान, राजे, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असते. पण जागतिक पातळीवर वाढत चाललेली स्पर्धा, त्यातून निर्माण झालेली राजकीय वैर, भूभाग संपादनांची महत्त्वाकांक्षा, हद्दविस्तार करण्याची कार्यप्रणाली यातून राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या जीवाला धोका वाढलेला असतो. त्यामुळे अमेरिका, रशियासारख्या राष्ट्रांचे प्रमुख स्वत:सोबत आपली सुरक्षाही घेऊन फिरत असतात. त्यांचा आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास असतो. या दौऱ्यादरम्यान पुतिन त्यांच्या अधिकृत कारमधून प्रवास करत आहेत. रशियाची राष्ट्राध्यक्षांसाठी असलेली अधिकृत सरकारी कार ‘ऑरस सेनेट लिमोझिन’ आहे. ही कार शस्त्रभेदी गोळ्या आणि ग्रेनेड हल्ल्यांना तोंड देऊ शकते. यात पंक्चर झाल्यावरही चालणारे टायर, आपत्कालीन दरवाजे आणि रशियाच्या फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसच्या मानकांनुसार बनवलेली सुरक्षा आहे. पुतिन यांच्या दौऱ्यावर अमेरिकेसह, युरोप, चीन आणि पाकिस्तान या देशांचे लक्ष आहे. कारण रशिया आणि भारतामध्ये जे करार होतील, त्याचे दूरगामी परिणाम या देशांवर होऊ शकतात. म्हणून पुतिन यांचा भारत दौरा महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांमध्ये क्रूड ऑइल करार, संरक्षण आणि मुक्त व्यापार करारावर (एफटीए) यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या या दौऱ्यात सर्वाधिक लक्ष संरक्षण करारावर असेल. दोन्ही देशांच्या नौदलांसाठी एकत्रितपणे युद्धनौका योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.


पाकिस्तानच्या अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या कुरापती पाहता, पुतिन यांच्या दौऱ्यातील संरक्षण चर्चा हा सर्वाधिक लक्ष लागलेला भाग असेल, अशी अपेक्षा आहे. भारत अतिरिक्त एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीसह अनेक प्रलंबित खरेदी प्रक्रिया पुढे नेण्यास उत्सुक आहे. नागरी अणुऊर्जा हा आणखी एक विषय आहे, ज्यावर चर्चेची शक्यता आहे. पुतिन यांच्या या भेटीत दोन्ही देश एक नवीन पेमेंट प्रणाली तयार करण्यावर सहमत होऊ शकतात, ज्यामुळे व्यापार अखंडितपणे सुरू राहील. ऐतिहासिकदृष्ट्या, भारत हा रशियाच्या शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे आणि सुखोई-३० विमाने भारतीय हवाई दलाचा भाग आहे. या शिखर परिषदेत संरक्षण मंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण हार्डवेअर खरेदीबाबतच्या चर्चांचा समावेश आहे. रशियाकडून ५ लाख ८५ हजार कोटी आयात, तर भारताची केवळ ४५ हजार कोटींची निर्यात आहे, या व्यापार असंतुलनामुळे औषधे आणि कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्याची गरज अधिक आहे. रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतीय वस्तूंवर अमेरिकेने २५-५०% पर्यंत शुल्क लादले आहे. यामुळे भारत-अमेरिकेदरम्यान भू-राजकीय तणाव वाढला आहे. त्यामुळे नवीन करारांवर सावधगिरी बाळगण्याची शक्यता आहे. नागरी अणुऊर्जा आणि युरेशियन मुक्त व्यापार चर्चा यांसारख्या इतर मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित केले जाईल. क्षेपणास्त्र घटक आणि लढाऊ विमानांच्या अपग्रेडेशनच्या संयुक्त उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामुळे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या मोहिमेला बळ मिळेल. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानांचे उत्पादन करते, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. या क्षेत्रात प्रगती झाल्यास बहुवर्षीय करारांची शक्यता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष निकालापूर्वीच या कंपन्यांकडे लागून आहे. भारत-रशिया मित्र राष्ट्र असली तरी एकमेकांना त्यांनी आजवर व्यापाराच्या माध्यमातून मदत केली आहे. या दौऱ्यात संरक्षण सहकार्यासोबतच व्यापार आणि ऊर्जा सुरक्षा यावर भर दिला जाईल. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसंदर्भातील घोषणांमुळे संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांच्या शेअर्समध्ये तेजी दिसू शकते, अशी बाजार तज्ज्ञांना अपेक्षा आहे. या भेटीमुळे उभय राष्ट्रांमधील संबंध वृद्धिंगत होतील, व्यापार वाढेल, भारत-रशियाविरोधी राष्ट्रांना या भेटीतून चपराक बसेल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

Comments
Add Comment

धुरळा कशासाठी ?

भारतात लोकशाही केवळ निवडणुकांमधेच शिल्लक असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध लोकशाहीवादी संघटना

मानवतावादाचा मुखवटा

कोणताही संघर्ष आतापर्यंत युद्धाने संपलेला नाही आणि कोणताही पेच युद्धाने सुटलेला नाही. तरीही युद्धे सातत्याने

सभा चालू द्या

पंधरा दिवसांचं कामकाज आखलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस काल तुलनेने शांतपणे व्यतीत झाला.

ऐका निसर्गाच्या हाका

नेमेचि येतो पावसाळा' हे वचन आता इतिहासात राहिले आहे. सध्या पाऊस भारतीय उपखंडात आणि दक्षिण भारतात वाढत चालला आहे

बिघडलेल्या हवेचे वर्तमान

मुंबईची हवा सध्या पूर्ण बिघडली आहे. राजकारणाने नाही; हवेतील धुलीकणांनी. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या

राष्ट्रीय चेतनेचा उदय

अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज विराजमान झाला तो दिवस मंगळवार २५ नोव्हेंबर २०२५. या भव्य मंदिरावर