मराठवाड्यातील मतदारांना रंगतदार निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा

डॉ . अभयकुमार दांडगे
abhaydandage@gmail.com


मराठवाड्यातील एकूण ४६ नगरपालिका तसेच नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात नगराध्यक्ष पदासाठी एकूण २६२ उमेदवार रिंगणात आहेत. मराठवाड्यात असलेल्या आठ जिल्ह्यांतील निवडणुका रंगतदार ठरल्या. या निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांसह उमेदवारांना धडकी भरली आहे. निकाल कोणाच्या बाजूने, कसा लागेल यासाठी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पैजा लागल्या आहेत. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी अटीतटीचा सामना पार पडला. तसेच मैत्रीपूर्ण लढती देखील चर्चेत आहेत.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद नगरपालिकेत अध्यक्ष पदासाठी नऊ तर कन्नडमध्ये चार, सिल्लोडमध्ये सात, गंगापूरमध्ये सहा, पैठणमधील सहा, वैजापूरमधील तीन जणांचे नशीब मतदान यंत्रात बंद झाले आहे. बीड जिल्ह्यात अंबेजोगाईत अध्यक्षपदासाठी आठ, बीड नगरपालिकेत १९, गेवराईमध्ये सहा, किल्लेधारूर मध्ये पाच, माजलगाव चार, परळी वैजनाथ आठ उमेदवार अध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व कळमनुरी नगरपालिकेत निवडणुकीसाठी १५ जण रिंगणात आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, औसा या नगरपालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस दिसून आली. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा आणि गंगाखेड नगरपालिका निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवक पदासाठी १६५ जागांवर सहाशे दोन उमेदवार नशीब आजमावत आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड, परतुर आणि भोकरदन या तीन नगरपालिकांसाठी रंगतदार निवडणूक झाली. तर धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग, परांडा, तुळजापूर तसेच उमरगा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मराठवाड्यातील सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, मुदखेड, उमरी, भोकर, किनवट तसेच लोहा, कुंडलवाडी या नगर परिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरासरी ७०% मतदान झाले. मराठवाड्यातील एकूण ५२ नगरपालिका व नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला होता. यामध्ये अध्यक्षपदासाठी ३०२ जणांनी तर नगरसेवक पदासाठी ४१८७ जण रिंगणात होते; परंतु काही ठिकाणी सदस्य पदासाठीच्या उमेदवारांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर त्या प्रभागातील निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केल्या. तसेच काही ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराविरुद्धही याचिका दाखल झाल्याने निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी संपूर्ण नगरपालिका तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. स्थगित झालेल्या जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे व त्यानंतर दुसऱ्या दिवशी २१ डिसेंबर रोजी या सर्व निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.


मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मंगळवार दिनांक २ डिसेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी मोठी चढाओढ पाहण्यास मिळाली. यंदा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष देखील रिंगणात उतरल्याने निवडणुका अधिक चुरशीच्या ठरल्या. राज्यात सत्तेत एकत्र असलेले महायुतीतील घटक पक्ष तसेच विरोधात असलेले महाविकास आघाडीतील मित्रपक्ष देखील एकमेकांविरुद्ध रिंगणात उतरल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली. मतदानासाठी प्रशासन सज्ज होते. तसेच पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. आता प्रत्येक जिल्ह्यातील मतदान यंत्रात उमेदवारांचे भवितव्य बंद झालेले असून मतदान यंत्र चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. तसेच त्या ठिकाणीही प्रशासनाकडून देखरेख केली जात आहे. पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच हॉटेलमध्ये थांबले होते; परंतु दोघांनीही एकमेकांची भेटही घेतली नाही. तसेच एकमेकांचे चेहरे देखील पाहिले नाहीत. त्यामुळे निवडणूक निकालाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर स्पष्टपणे जाणवणार असल्याचे भाकीत राजकीय विश्लेषक करीत आहेत. याबरोबरच हिंगोली जिल्ह्यात आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या वंजारवाड्यात ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला सव्वा कोटी रुपये एका वाहनातून जप्त करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली. एम.३८-एडी-६५०२ या वाहनातून सदरील रक्कम पकडण्यात आल्यानंतर ती रक्कम उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणण्यात आली. सदरील रक्कम कळमनुरी तालुक्यातील गजानन कृषी सेवा केंद्राचे अमित हेडा यांची असल्याचा दावा त्यांनी केला. सदरील रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी काढण्यात आली असल्याचे त्या व्यापाऱ्याने स्पष्ट केले. मतदानाच्या दिवशी आमदार संतोष बांगर हे एका मतदान केंद्रात मतदान करणाऱ्या महिलेला बोलत असतानाचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे त्यांनी त्या महिलेला मतदानासाठी मदत केली, या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला. एकंदरीत मराठवाड्यात एकनाथ शिंदे गट विरुद्ध भाजप असे चित्र पहावयास मिळाले.


न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे राज्यातील २० नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ७६ नगरपंचायती आणि नगरपरिषदांमधील १५४ सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. हे नियमाला धरून असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर असताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या या कृतीबद्दल नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावत या निवडणुका रद्द केल्या आहेत. कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणुका पुढे ढकलण्यात येतील, असे आजपर्यंत झाले नव्हते अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. तर निवडणुका रद्द करण्यामागे सत्ताधारी पक्षाचा हात आहे असा आरोप माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक तर लातूर जिल्ह्यातील निलंगा व रेणापूर नगरपरिषदेची निवडणूक स्थगित झाल्यानंतर राजकीय पक्षांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तसेच नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद व मुखेड नगर परिषदेची निवडणूक स्थगित झाली आहे. २० डिसेंबर रोजी पुढील मतदान होणार असल्याने सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी आता या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान मराठवाड्यात पार पडलेल्या निवडणुकीत आपलाच पक्ष विजयी होणार यासाठी लाखो रुपयांच्या पैजा लागलेल्या आहेत. तसेच यानिमित्त सट्टा बाजार देखील तेजीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल

डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकातून नावच गायब

बाहेरगावच्या प्रवाशांंमध्ये संभ्रम डोंबिवली  : गेल्या वर्षापासून डोंबिवली स्थानकाचे नूतनीकरण, डागडूजी,

मराठवाड्यात उमेदवारी अर्जांचा पाऊस

छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल

कर्माचे प्रतिबिंब

ऋतुराज : ऋतुजा केळकर आज अचानक एका अतिशय वाईट वृत्तीच्या घमेंडी, उद्धट ओळखीच्या व्यक्तीला असाध्य रोग झाल्याचे