दत्तोपासनेचे सार

ऋतुराज : ऋतुजा केळकर


संध्याकाळच्या समयी मंद समईच्या उजेडात मी गुरुदेवांच्या छायेत बसून नकळत हरवून जाते. त्या शांततेत मनाला एक दिव्य स्पर्श जाणवतो. विचारांच्या लहरी थांबतात आणि अंतःकरणात भक्तीचा स्वर उमटतो. त्या क्षणी शब्द आपोआप चारोळीच्या रूपाने ओघळतात.…


‘चार श्वान वेदांचे,


चरणी तुझ्या विसावले...


दंड कमंडलू देखणे,


रूप तुझे दिव्य भासले...


भगवे वस्त्र परिधान,


तेज तुझ्या मुखी झळकावे...


दत्तगुरू, तुझ्या चरणी


माझे मन सदैव विसावे...’


अगदी मनापासून सांगायचं झाल तर, “दत्त” हा शब्द केवळ उच्चार नाही, तर तो संपूर्ण अध्यात्माचा सार आहे. मला समजलेला ‘दत्त’या शब्दाचा अर्थ आज मी सांगते पाहा बरं पटतोय का? ‘दत्त’मधील प्रथम अक्षर ‘द’ म्हणजे ‘दमन’, अंतःकरणातील विकार, वासना, अहंकार, राग-द्वेष यांचे दमन करून आत्मा शुद्ध करणे. अर्थात हे दमन म्हणजे देहाला त्रास देणे नव्हे, तर मनाला निर्मळ करणे. निष्काम कर्म करणे, नामस्मरण करताना मनात एकच इच्छा असावी ती म्हणजे, “मला भगवंताशिवाय दुसरं काही नको.” नामस्मरण करताना जर भगवंत समोर उभा ठाकला आणि विचारले “तुला काय पाहिजे?” तर उत्तर असावे “मला तुझे नामच दे.” हीच खरी निष्कामता. कारण रूप नाहीसे होऊ शकते, पण नाम अखंड टिकते आणि नाम घेतले की भगवंत आपल्याकडे येतोच.


‘दत्त’ या शब्दातील पुढील अक्षर म्हणजे ‘त’ म्हणजे ‘तरणे’ या भवसागरातून पार होणे. जीवनात सुखसोयी असूनही मनात एक अदृश्य तळमळ असते. कारण दुःखाचे खरे स्थान आपल्याला कळत नाही. ते जाणण्यासाठी भगवंताच्या नामाची गरज आहे. वासनेच्या तावडीतच जीवाच्या अस्ताचा क्षण लपलेला असतो म्हणून, भगवंताच्या नामात राहणे त्यातच विलीन होणे हेच खरे तरणे आहे.


गुरुस्थानाचे महत्त्व या प्रवासात सर्वोच्च आहे. गुरू ईश्वर स्वरूपच आहेत. शिष्यासाठी गुरू हीच श्रद्धा, गुरू हीच उपासना आणि गुरू हीच सेवा आहे. शिष्याने काया-वाचा-मनसा अखंडपणे गुरुभक्ती करावी, कारण गुरू आत्मोपदेश देऊन आत्मोद्धार करतात. गुरू हेच सर्वश्रेष्ठ आहेत. गुरूंचे स्थान ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते. भक्ताच्या भक्तीने प्रसन्न झालेला ईश्वर भक्ताला गुरूकडेच पाठवतो. श्रीकृष्णासारखा परिपूर्ण ईश्वरही सांदीपनी गुरूंना शरण जाऊन सेवा व उपासना करतो म्हणून, ईश्वर शोधण्यापेक्षा गुरू शोधावा. गुरुस्थान इतके पूज्य, पवित्र व पावन आहे की शिष्याने तेथे व्यावहारिक बुद्धी ठेवू नये. गुरुसेवा हीच ईश्वरसेवा, गुरूंची उपासना हीच ईश्वराची उपासना आहे.


गुरुस्थानाचे महत्त्व सर्वोच्च आहे, कारण गुरूच अखेरीस ईश्वराकडे नेणारा मार्ग दाखवतात. गुरू म्हणजे आत्म्याचा दीपस्तंभ, जो अंधारातही दिशा दाखवतो. शिष्याच्या जीवनात गुरुचरणांचा स्पर्श म्हणजे जणू अमृताचा थेंब आणि या गुरू परंपरेत दत्तगुरू हेच सर्वोच्च स्थानावर विराजमान आहेत. दत्तगुरू म्हणजे त्रिमूर्तींचे साक्षात रूप, शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांचे अद्वितीय अद्वैत आहे म्हणूनच, दत्तोपासना ही केवळ भक्ती नाही, तर ती गुरुस्थानाचीच पराकाष्ठा आहे. गुरुस्थानाच्या पूज्यत्वातूनच दत्तभक्तीचा उदय होतो आणि म्हणूनच ती दुर्लभ, गूढ व भाग्यवानांना लाभणारी ठरते. दत्तभक्ती ही दुर्लभ आहे. दत्तात्रेय हे उपास्य दैवत असणे ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या पूजनात पावित्र्याचे पालन अत्यावश्यक आहे. यात त्रुटी राहिल्यास दंड ठरलेलाच आहे. पण, जर पावित्र्याच्या कक्षा रुंदावत उपासनेत यश मिळाले, तर तो भक्त अत्यंत भाग्यवान ठरतो. दत्त महाराजांनी स्वतः भक्तांना आश्वस्त केले आहे की, “जो भक्त माझी मनापासून काया-वाचा-मनसाने भक्ती करेल, त्याचा उद्धार मी करणारच.” ते नाना रूपधर आहेत. त्यामुळे ते कधी कोणत्या रूपात समोर येतील हे कळणार नाही, पण ते आपणास भेट देऊन जातील हे निश्चित. भक्तांसाठी अत्यंत कनवाळू आणि अभक्तांसाठी अत्यंत कठोर असे हे दैवत आहेत. पण, तरीही दत्त भक्तांची संख्या मर्यादित दिसते. कारण दत्त भक्ती दुर्लभ आहे. त्याचे मूळ कारण म्हणजे अनंत जन्मांची पुण्याई असली तरच दत्त भक्ती वाट्याला येते. दत्तगुरुंच्या हातातील आयुधे ही त्रिमूर्तीचे प्रतीक आहेत. कमंडलू व जपमाळ हे ब्रह्मदेवाचे, शंख व चक्र हे विष्णूचे, तर त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहेत. त्यांच्या पादुका शिव-शक्तीचे प्रतीक आहेत. डावी पादुका ही शिवस्वरूप असून ईश्वराची अप्रकट तारकशक्ती दर्शवते, तर उजवी पादुका ही शक्तिस्वरूप असून ईश्वराची अप्रकट मारकशक्ती दर्शवते. म्हणूनच दत्त संप्रदायात गुरूपेक्षा गुरुचरणांना अधिक महत्त्व दिले जाते. श्रेष्ठ सत्पुरुषांची दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यामुळे चरणस्पर्शाने ती भक्तांत संचारते. गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुका आहेत, गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुका मागे ठेवल्या, नृसिंहवाडीलाही दत्तपादुकांची पूजा केली जाते. विष्णूचा जसा शाळीग्राम तसा दत्तोपासनेत दत्तपादुकांना महत्त्व आहे.


मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी, मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. त्या काळी आसुरी शक्तींचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता. देवगणांचे प्रयत्न असफल ठरले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार दत्त देवतेने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत अवतार घेतला आणि दैत्यांचा नाश केला. तो दिवस आजही दत्तजन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.


ही जी मूळमाया आहे ती प्रलयकाळी गुप्त असते, तर सृजनकाळी प्रगट स्वरूपात असते. जीवामध्ये ती चैतन्यरूपात व्यक्त होते, तर जड सृष्टीमध्ये अप्रगट असते. पाण्याचे लोट पावसाळ्यात उफाळून येतात, पण उन्हाळ्यात थेंबालाही दिसत नाहीत. पाणी तशीच मूळमाया कधी प्रगट, तर कधी अप्रगट असते. वारा कधी शांत असतो, तर कधी वादळरूपात जग उद्ध्वस्त करतो, तसेच दत्तगुरू म्हणजे विकारांचे दमन करून भवसागरातून तरून नेणारा गुरू आहे. त्यांचे स्थान ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांची भक्ती दुर्लभ आहे, पण ज्याला ती लाभते तोच खरा भाग्यवान. त्यांच्या आयुधांत त्रिमूर्तीचे प्रतीक आहे, त्यांच्या पादुकांत शिवशक्तीचे दर्शन आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेले दत्तगुरू आजही भक्तांच्या जीवनात प्रकाश पेरतात.अखेरीस इतकेच सांगेन की, भक्ती, नामस्मरण आणि गुरुचरणी समर्पण हाच दत्तोपासनेचा सार. जसा एखादा मंद समईचा उजेड संध्याकाळी मनाला शांत करतो, तसा दत्तगुरुंचे स्मरण आपल्या अंतःकरणाला उजळवते.

Comments
Add Comment

मनातील कलह

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य माणूस हा विचार करणारा, जाणिवा असलेला जीव आहे. त्याच्या प्रत्येक कृतीमागे,

कपिल महामुनी

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी सांख्य तत्त्वज्ञानाचे आद्यप्रवर्तक कपिलमहामुनी होत. त्यांनी सांख्यदर्शनाचे

माँ नर्मदा...

!! नमामि देवी नर्मदे!! नर्मदा परिक्रमा म्हणजे एक अध्यात्मिक अनुभूती आहे. ही परिक्रमा म्हणजे नर्मदा मैय्याभोवती

Dattatreya Jayanti 2025 : त्रिमूर्ती स्वरूप, २४ गुरूंचे ज्ञान! आदिगुरु दत्तात्रेय कोण? मार्गशीर्ष पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय?

सनातन धर्मामध्ये दत्त जयंतीला अत्यंत विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष

मृगजळाच्या लाटांत दीपस्तंभाची स्थिरता

ऋतुराज : ऋतुजा केळकर आज का कोणजाणे, पण माझं मन अतिशय अस्थिर होतं आणि अचानक शब्द उमटले, कल्पनाः मृगतृष्णेव, नित्यं

देव आहे का?

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य देव आहे का?” हा प्रश्न मानवजातीसमोर हजारो वर्षांपासून उभा आहे. अनेकांनी त्यावर