नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांचे स्वागत केले. यानंतर मुंबईत नोंद झालेल्या एकाच टोयोटा फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन एकत्र रवाना झाले. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींसोबत एकाच कारमध्ये प्रवास करून प्रोटोकॉल तोडला. विशेष म्हणजे ही अधिकृत कार नव्हती तर मुंबईत नोंद झालेली पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर सिग्मा होती. या एकाच घटनेने द्विपक्षीय संबंधांमधील सातत्य आणि वाढती विश्वासार्हता तसेच जागतिक भू राजकीय परिस्थिती वेगाने होत असलेला बदल दाखवून दिला असल्याचे मत अनेक विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. अमेरिका भारतावर एकतर्फी टॅरिफ लादत असताना रशिया भारताच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे या निमित्ताने पुन्हा अधोरेखीत झाल्याचे मत पण विश्लेषकांनी व्यक्त केले.
Delighted to welcome my friend, President Putin to India. Looking forward to our interactions later this evening and tomorrow. India-Russia friendship is a time tested one that has greatly benefitted our people.@KremlinRussia_E pic.twitter.com/L7IORzRfV9
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2025
पुतिन यांच्यासाठी मोदींनी गुरुवारी रात्री विशेष खासगी जेवणाची व्यवस्था केली. या जेवणाच्या निमित्ताने पुतिन आणि मोदी यांची अनौपचारिक चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनौपचारिक भेटीने शुक्रवारी होणाऱ्या २३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेचा पाया रचला जाईल. संरक्षण सहकार्य, बाह्य दबावांपासून द्विपक्षीय व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी धोरणे आणि लहान मॉड्यूलर अणुभट्ट्यांवर संभाव्य सहकार्य हे चर्चेचे प्रमुख मुद्दे आहेत. यामुळे भारत आणि रशिया यांच्यात काय चर्चा होते आणि काय करार होतात याकडे जगातील अनेकांचे लक्ष आहे.
भारत-अमेरिका संबंधांमध्ये लक्षणीय घसरण होत असताना पुतिन यांचा सुमारे २७ तासांचा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. शुक्रवारी होणाऱ्या शिखर परिषदेनंतर व्यापारासह विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही बाजूंनी अनेक करारांना अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे. याआधी शुक्रवारी सकाळी राष्ट्रपती भवनात पुतिन यांचे औपचारिक स्वागत होईल. त्यानंतर पंतप्रधान मोदी हैदराबाद हाऊस येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि त्यांच्या शिष्टमंडळासाठी जेवणाचे आयोजन करतील. या जेवणाच्या निमित्ताने अनेक विषयांवर चर्चा होईल. नंतर शिखर परिषद होईल.
शिखर परिषदेनंतर पुतिन भारतात प्रसारण सुरू करत असलेल्या रशियाच्या सरकारी वाहिनीचे औपचारिक उद्घाटन करतील. पुतिन यांच्या दौऱ्याची सांगता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीने होणार आहे. पुतिन दौरा पूर्ण करुन रात्री नऊ किंवा त्यानंतर रशियासाठी रवाना होणार आहेत.
संरक्षण सहकार्याबाबत होणार चर्चा
पुतिन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान मुक्त व्यापार करार, संरक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे करार आणि तेल व्यापाराशी संबंधित नवे करार होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांदरम्यान सुखोई ५६ आणि एस ४०० क्षेपणास्त्राच्या खरेदीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत एस ४०० क्षेपणास्त्राची आणखी किमान पाच युनिट खरेदी करण्याबाबत विचार करत आहे. याआधीच भारताने एस ४०० क्षेपणास्त्राच्या पाच युनिटच्या खरेदीचा एक करार केला आहे. या करारात नमूद पाच युनिटपैकी तीन युनिट भारताला मिळाली आहेत. आणखी दोन युनिट लवकरच मिळणार आहेत.
पुतिननी केली मोदींची स्तुती
भारत दौऱ्यावर येण्याआधी भारतीय पत्रकारांना दिलेल्या विशेष मुलाखतीत पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली. मोदी एक विश्वासार्ह नेते आहेत, असे पुतिन म्हणाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक विश्वासार्ह नेते म्हणून पुतिन यांनी मोदींचा कौतुकाने उल्लेख केला. तसेच भारतासोबत विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची इच्छा व्यक्त केली.






