भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याआधीच स्टेट ड्युमाने अर्थात रशियाच्या लोकसभेने भारतासोबतच्या एका मोठ्या लष्करी रसद कराराला औपचारिक मान्यता दिली आहे. या करारावर १८ फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली होती. रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट अर्थात रेलोस (RELOS) हे या कराराचे संक्षिप्त नाव आहे.


लष्करी रसद करारामुळे आवश्यकता भासल्यास भारत आणि रशियाचे सैन्य परस्परांची जमीन, विमानतळ, धावपट्ट्या, बंदरे, जेट्टी आदी सैन्य सुविधांचा वापर करू शकतील. हा करार चीनची चिंता वाढवणार आहे. कारण या करारामुळे भारताला रशियाच्या मध्य आशियातील सैन्य तळांचा आवश्यकता भासल्यास वापर करता येणार आहे. भारत आणि रशिया एकमेकांशी समन्वय साधून एकमेकांच्या लष्करी तळांचा आवश्यकतेनुसार वापर करतील. या करारामुळे दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याला फायदा होणार आहे.


ड्युमाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या तपशीलांनुसार, या करारामुळे दोन्ही बाजूंच्या लष्करी विमाने, जहाजे आणि इतर संघटनांना संयुक्त सराव, प्रशिक्षण कार्यक्रम, मानवतावादी ऑपरेशन्स आणि आपत्ती-मदत मोहिमांसह विविध उपक्रमांसाठी एकमेकांच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी मिळेल. दोन्ही देशांची सरकारे जिथे ऑपरेशन्स करण्यास सहमत असतील तिथेच हा करार लागू होणार आहे.


करारामुळे दोन्ही देशांच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. भारत-रशिया या दोन देशांचे संबंध विश्वास, प्रदीर्घ मैत्रीवर अवलंबून आहेत आणि हीच बाब या करारामुळे अधोरेखीत झाल्याचे स्टेट ड्युमाचे सभापती व्याचेस्लाव वोलोडिन म्हणाले.


रशियाचे तझाकिस्तान, किर्गिस्तान आणि कझाकिस्तान येथे सैन्य तळ आहेत. हे सैन्य तळ चीनची तिन्ही महत्वाची रणनितीक क्षेत्र अक्सु, कासगर आणि यिनिंगच्या जवळ आहेत. चीनच्या तेलाचा आणि शस्त्रांचा मोठा साठा याच भागात असतो. अक्सु हे चीनचं प्रमुख तेल उत्पादन क्षेत्र आहे. कासगर शिंजियांग प्रांतातील लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे तसेच चीन-पाकिस्तान विशेष आर्थिक क्षेत्राचे चीनमधील प्रवेशद्वार आहे. यिनिंगमध्ये चीन मोठ्या प्रमाणात शस्त्र निर्मिती करतो. याच शहरात शस्त्रांचा मोठा साठा आहे. भारत या सर्व ठिकाणांच्या जवळ पोहोचणार असल्यामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे.


आतापर्यंत चीनने पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमार यांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. पण भारत आणि रशिया यांच्यातील करारामुळे चीनला पेचात पकडण्याची संधी भारताला मिळाली आहे.


चीनवर शिंजियांग प्रांतात उइगुर मुस्लिमांचा छळ केल्याचा आरोप होतो. या आंतरराष्ट्रीय पातळीवर कायम चर्चेत असलेल्या मुद्याला आणखी तापवणे भारताला आता सोपे होणार आहे. मध्य आशियातून भारत चीन शिंजियांग प्रांतात करत असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवू शकेल. यामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त