मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याची पत्नी गौरी पालवे यांच्या मृत्यू प्रकरणात नवी आणि महत्त्वाची माहिती हाती आली आहे. गौरी पालवे यांनी मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर गौरीच्या वडिलांनी आणि माहेरच्या इतर नातलगांनी अनंत गर्जे आणि त्याच्या भावंडांवर गंभीर आरोप केले. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. गुन्हा नोंदवल्यानंतर अनंत गर्जेला अटक करुन त्याची कसून चौकशी करण्यात आली तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यातून भरपूर नवी महिती पोलिसांच्या हाती आली आहे.
गौरीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अनंतने भिंतीवर डोकं आपटण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली. पोलिसांना या संदर्भातले एक सीसीटीव्ही फूटेज मिळाले आहे. अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता. त्यामुळे घराच्या खिडकीला ज्या व्यक्तीने जाळ्या बसवल्या त्यालाच जाळीमधून आतमध्ये प्रवेश करता येतो का? याचं प्रात्याक्षिक दाखवायला सांगण्यात आलं होतं. यातून आवश्यक ती माहिती पोलिसांनी मिळवली आहे. डॉक्टरांनी अनंतच्या शरीरावर २८ ताज्या जखम असल्याचे पोलिसांना सांगितले. या संदर्भात न्यायालयाला माहिती देऊन पोलीस नंतर अनंतची पॉलिग्राफ टेस्ट करणार आहेत. मानसशास्त्रीय तज्ज्ञाच्या सहकार्याने अनंतची तपासणी केली जाणार आहे.
अनंतच्या जुन्या प्रेयसीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. या जबाबानुसार अनंतसोबत २०२२ पासून तिचा संबंध नव्हता. गौरीच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांबाबत कल्पना नाही, असा जबाब संबंधित महिलेने पोलीस चौकशीत दिला आहे.