Sunday, November 30, 2025

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा महिन्यांपासून अधिक काळ बंद असल्यास त्या ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. बंद व नादुरुस्त जलमापक तात्काळ बदलण्याबाबत ग्राहकांना कळविण्यात आले आहे. त्यानंतरही बहुतांश ग्राहकांनी जलमापक बदललेले नाहीत्य त्यांचा पाणीपुरवठा २४ तासांची नोटीस बजावून खंडित करण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या शहरातील सर्व ग्राहकांना बंद असलेले तसेच नादुरुस्त जलमापक यंत्र नव्याने बसविण्याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागा मार्फत सांगण्यात आले आहे.

पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील सर्व मालमत्तांची पाणीपट्टी बील काढण्यासाठी त्या-त्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या जलमापकाच्या नोंदी घेण्याचे काम सुरू आहे. जलमापक यंत्राच्या नोंदी घेत असताना बहुतांश ग्राहकांच्या जलजोडणीस बसविलेले पाण्याचे जलमापक यंत्र बंद, नादुरुस्त असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ज्या आस्थापनांचे वा मालमत्तांचे जलमापक बंद किंवा नादुरुस्त आहेत, अशा ग्राहकांना पालिकेने मे ते ऑगस्ट या काळात पाठविलेल्या पाणीपट्टी बीलात त्यांचे जलमापक सदोष असल्याचे नमूद केले होते. त्यानंतरही सदोष जलमापक बदलले नसल्याचे दिसले.

कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी बंद व नादुरुस्त जलमापक यंत्र तत्काळ बदलून नवीन जलमापक यंत्र बसवावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. जलमापक बदलल्याची माहिती अर्जाद्वारे विभागाला कळविण्यात यावी. त्यामुळे जलमापकातील नोंदीनुसार देयक आकारणे शक्य होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment