मुंबई:'हेवी डिपॉझिट'च्या नावाखाली फसवणुक करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ विशेषत: मुंबईमध्ये झाल्याचे दिसते. मुदत संपल्यावर अनामत रक्कम परत न करणे, घर मालकाच्या नकळत घर दुसऱ्याला भाड्याने देणे किंवा एकाच घरासाठी अनेकांकडून डिपॉझिटच्या स्वरूपात पैसे उकळणे असे प्रकार वाढले असल्याने याविरोधात मुंबई शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीत राहणाऱ्या एका तरुणीच्या वडिलांनी मुंबईतील वांद्रे-माहीम परिसरात घर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत एका तरुणाने आईच्या नावावर घर असल्याचे सांगून चार लाख रुपये हेवी डिपॉझिट म्हणून घेतले. मात्र, घराची चावी देण्यास उशीर झाला म्हणून चौकशी केल्यावर हा तरुण आणि त्याच्या आईने अनेकांना अशाच प्रकारे फसवल्याचे समोर आले आहे.
मुंबई: डिसेंबर महिना सुरू होताच एक आनंदाची बातमी आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. यामुळे व्यावसायिकांना ...
दुसरीकडे, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात एका शिलाईकाम करणाऱ्याने चार लाखांचे हेवी डिपॉझिट देऊन खोली भाड्याने घेतली. मुदत संपल्यावर पैसे परत मागितले असता, घर मालकिणीने टाळाटाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. तर वरळीतही असा प्रकार समोर आला. एका मालकाने बाराव्या मजल्यावरील खोली अकरा महिन्यांच्या आगाऊ भाड्यावर दिली होती. मुदत संपण्यापूर्वी मालक चौकशीला पोहोचला असता, भाडेकरूने मालकाच्या नकळत तीच खोली दुसऱ्याला पंधरा लाख रुपये हेवी डिपॉझिटवर भाड्याने दिल्याचे उघड झाले आहे.
'हेवी डिपॉझिट' म्हणजे काय?
घर भाड्याने घेताना घरमालकाला मोठी अनामत रक्कम देणे आणि त्या बदल्यात मासिक भाडे कमी किंवा अजिबात न भरणे. करार संपल्यावर किंवा घर सोडताना ही अनामत रक्कम भाडेकरूला परत मिळते. यामुळे घरमालकाला एकाच वेळी मोठी रक्कम मिळते, ज्यावर तो व्याज मिळवू शकतो. तर भाडेकरूला दरमहा भाडे देण्याची गरज नसते व शेवटी त्याला संपूर्ण रक्कम परत मिळते. दरम्यान, हे गैरप्रकार रोखण्यासाठी घरमालकांसह भाड्याने घर घेण्याच्या विचारात असणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.