मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा आनंदमय सोहळा माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडला. मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत आयोजित ह्या सोहळ्यामध्ये ७०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, ‘फेसकॉम’ अध्यक्ष (मुंबई विभाग) सुरेश पोटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. प्राची जांभेकर ह्यांच्या हस्ते पदाधिकारी तसेच ज्येष्ठांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी एक व्यापक धोरण मंजूर केले आहे. अशाप्रकारचे धोरण राबविणारी ही एकमेव महानगरपालिका आहे. या धोरणामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानाचे होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठांना डिजिटल साक्षरता, नवनवीन उपक्रम, सुटीतील वाचनालय अशा महत्त्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शनही करण्यात आले.
सोहळ्याच्या पहिल्या सत्रात ‘युनोस्को’ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांविषयी दृकश्राव्य माध्यमातून माहिती देण्यात आली. तर, अखेरीस ज्येष्ठांमधील गुणप्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये गाणी, नकला यांचे सादरीकरण करण्यात आले. दीप्ती कुलकर्णी यांनी सादर केलेल्या मनोरंजनात्मक गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला.