डॉ. सर्वेश सुहास सोमण
जगामध्ये अमेरिकेच्या शुल्काचा (टॅरिफचा) दबाव आहे, खासगी गुंतवणूक मंदावली आहे, तरीही भारताची अर्थव्यवस्था जुलै-सप्टेंबर तिमाहीत ८.२ % दराने वाढली आहे. गेल्या ६ तिमाहीतील जीडीपीमधील ही सर्वाधिक वाढ आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ती ५.६% होती, तर एप्रिल-जूनमध्ये ती ७.८% होती.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीनुसार, ग्रामीण मागणी, सरकारी खर्च आणि उत्पादन क्षेत्राच्या गतीने अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे, हे स्पष्ट होते. जीएसटी दर कपातीचा पूर्ण परिणाम अजून यायचा आहे; परंतु हे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. आरबीआयने ६.५ % आर्थिक वाढीचा अंदाज वर्तवला होता.१ऑक्टोबर रोजी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मौद्रिक धोरण बैठकीत आर्थिक वर्ष २०२६ साठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज ६.५% वरून ६.८% पर्यंत वाढवला होता. याचा अर्थ दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ आरबीआयच्या अंदाजित वाढीपेक्षाही चांगली राहिली आहे.
जीडीपी (GDP) म्हणजे काय?
अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी जीडीपीचा वापर केला जातो. हे देशांतर्गत एका निश्चित कालावधीत सर्व वस्तू आणि सेवांच्या मूल्याचे प्रतिनिधित्व करते. यात देशाच्या सीमेत राहून परदेशी कंपन्या जे उत्पादन करतात, त्यांचाही समावेश केला जातो.
जीडीपी (GDP) दोन प्रकारची असते.
जीडीपी दोन प्रकारची असते. वास्तविक जीडीपी आणि नाममात्र जीडीपी. वास्तविक जीडीपीमध्ये वस्तू आणि सेवांच्या मूल्याची गणना आधारभूत वर्षाच्या मूल्यावर किंवा स्थिर किमतींवर केली जाते. सध्या, जीडीपीची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष २०११-१२ आहे. तर, नाममात्र जीडीपीची गणना सध्याच्या किमतींवर केली जाते. पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांक निफ्टीची गती आणि दिशा दोन्ही तेजीची असून निफ्टीची २५८४० ही महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकातील तेजी टिकून राहील. त्याचवेळीनिर्देशांक उच्चांकाला आहेत हे लक्षात ठेवून व्यवहार करणे आवश्यक आहे.पुढील आठवड्यात निफ्टीने २६२५० ही पातळी बंद तत्वावर तोडली तर निफ्टीत आणखी तेजी येऊ शकते. शेअर्सचा विचार करता सनफार्मा, सिसिएल, आदित्य बिर्ला, महिंद्रा अँड महिंद्रा, बायोकॉन यांची दिशा तेजीची आहे.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.
samrajyainvestments@gmail.com