आठवीतल्या मुलाकडून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न
मध्य प्रदेश : रतलाम येथील डोंगरे नगरस्थित बोधी इंटरनॅशल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विद्यार्थ्याने उडी मारल्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
खासगी रुग्णालयात विद्यार्थ्याच्या एमआरआयसह इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अजूनही उपचार चालू आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस ठाण्याचे प्रभारी सत्येंद्र घनघोरिया रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांकडून सदर घटनेची माहिती घेतली.
नेमकी घटना काय?
शाळेचे संचालक राजेंद्र पितलिया यांनी सांगितलं की, “हा विद्यार्थी शाळेत मोबाईल घेऊन आला होता. वर्गात बसून त्याने एक रील तयार करून इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. प्राचार्यांना या रीलबाबत समजल्यावर त्यांनी विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावून घेतलं होतं. ही घटना घडली तेव्हा त्याचे पालक शाळेतच होते. विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना पाहिलं आणि तिसऱ्या मजल्याच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर त्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्याच्या पालकांच्या संपर्कात आहेत. विद्यार्थ्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.
शाळेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. मुख्याध्यापकांच्या कक्षात विद्यार्थी माफी मागत असल्याचं दिसत आहे. त्याने चार मिनिटात तब्बल ५२ वेळा मुख्याध्यापकांची माफी मागितली. त्यानंतर तो तिथून शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याकडे धावू लागला. दुसऱ्या एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याचं दिसत आहे. विद्यार्थ्याचे वडील म्हणाले, “मला शाळेत बोलावण्यात आलं होतं. परंतु, मला का बोलावलं होतं ते माहिती नव्हतं. माझा मुलगा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत खेळणार होता. त्यासंबंधी काही कामानिमित्त मला बोलावलं असेल असं समजून मी गेलो होतो.