डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून पतीने हत्या केली. त्यानंतर पती फरार झाला. त्याला शोधण्यासाठी मानपाडा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटनेही तपासास गती दिली आहे. पोलिसांनी सद्गुरू निवास चाळीतील घरमालक वासुदेव दिवाणे यांच्या फिर्यादीवरून पोपट दाहिजे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काटई नाक्यावरील कोळेगावात असलेल्या कृष्णाई नगरमध्ये असलेल्या सद्गुरू निवास चाळीतील रूम नं. ४ मध्ये ज्योती आणि पोपट दाहिजे वास्तव्यास होते. पोपट यश डेव्हलपर्सकडे बिगारीचे काम करतो. बुधवारी सकाळी यश डेव्हलपर्सचे बाळासाहेब म्हस्के यांनी पोपट कामावर का आला नाही हे पाहण्यासाठी गेले असता घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. घरमालक वासुदेव यांना याबबत कळविले. म्हस्के यांनी ज्योतीच्या मोबाईलवर संपर्क साधला. ज्योतीच्या मोबाइल फोनचा आवाज घरातून येत होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता फरशीवर रक्त आढळले. दिवाणे आणि म्हस्के यांनी दाराला बाहेरून लावलेले कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. वासुदेव यांनी पोलीसांच्या मदतीने स्थानिक डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी ज्योतीला मृत घोषित केले. पती पोपटने ओढणीच्या मदतीने गळा आवळून पत्नला ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केल्यानंतर ज्योतीचा मृतदेह कडोंमपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडे पाठवून दिला.






