नवी दिल्ली : भारतीय सैन्यात अंदाजे १.८ लाख सैनिकांची कमतरता असल्याने लष्कराने अग्निवीरांची भरती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४५ हजार ते ५० हजार सैनिकांची वार्षिक भरती एक लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. २०२०-२१ मध्ये कोविड-१९ साथीचा आजार देशात बळावल्याने सैन्य भरती थांबवण्यात आली. या दोन वर्षांत एक लाख ते एक लाख तीस हजार सैनिक निवृत्त झाले आहेत. ज्यावेळी अग्निवीर योजना सुरू करण्यात येणार होती. त्यावेळी पुढील चार वर्षांत सैन्यात अग्निवीरांची भरती हळूहळू वाढवण्याचे नियोजन होते. याची मर्यादा १.७५ लाख होती. नौदल व हवाई दलातील भरतीची आकडेवारीही पुढील चार वर्षांत हळूहळू २८ हजार ७०० पर्यंत वाढवायची होती. अग्निवीर योजनेसह, २०२२ मध्ये कमी संख्येने लष्करात सैनिकांसह भरती सुरू झाली.