ऋतुराज : ऋतुजा केळकर
आज का कोणजाणे, पण माझं मन अतिशय अस्थिर होतं आणि अचानक शब्द उमटले,
कल्पनाः मृगतृष्णेव,
नित्यं भ्रान्तिप्रदाः स्मृताः ।
सत्यं तु देवस्मरणं,
यत्र शान्तिः परा स्थिरा ॥
नकळतच त्याचा अर्थ मनाला जाणवला तो असा, मनुष्याच्या कल्पना वाळवंटातील मृगजळासारख्या असतात. दूरवर पाणी दिसते, पण जवळ गेल्यावर ते फक्त वाळू ठरते. सुख, दुःख, वैभव, मान-सन्मान या सर्व कल्पना क्षणभंगूर आहेत. त्या मनाला थोडा आनंद देतात, पण लगेचच भ्रम निर्माण करतात. म्हणूनच त्या भ्रांतिप्रद आहेत. भ्रम देणाऱ्या आहेत.
खरे सत्य मात्र भगवंताच्या स्मरणात आहे. जेव्हा मन देवस्मरणात स्थिर होते, तेव्हा सुख-दुःखाच्या लाटा त्याला हलवू शकत नाहीत. जसा ध्रुवतारा प्रवाशाला दिशा दाखवतो, तसे भगवंताशी जोडलेले मन जीवनाला मार्गदर्शन करते. हीच खरी शांतता आहे. स्थिर, शाश्वत आणि अखंड.
मानवाचे जीवन हे सतत बदलत्या प्रवाहात वाहणाऱ्या नदीसारखे आहे. कधी ती नदी शांतपणे वाहते, कधी प्रचंड वेगाने धावते, तर कधी पूर आणून किनाऱ्यावरील सर्व काही वाहून नेते. सुख-दुःखाच्या अनुभूती या त्या प्रवाहातील लाटा आहेत की, ज्या क्षणभंगूर, चंचल आणि अनिश्चित आहेत. मनुष्य या लाटांमध्येच आपले सुख शोधतो आणि जेव्हा लाट शांत होते तेव्हा त्याला वाटते की, आता स्थैर्य मिळाले पण, पुढच्या क्षणीच नवी लाट येते आणि पुन्हा अस्थिरता निर्माण होते.
आपण कधी वैभवात सुख शोधतो, कधी नात्यांत, कधी यशात, तर कधी मान-सन्मानात पण, या सर्व कल्पना जणू वाळवंटातील मृगजळासारख्या आहेत. दूरवर चमकणारे पाणी दिसते; परंतु जवळ गेल्यावर ते फक्त वाळू ठरते. खरं तर वस्तू स्वतः सुखरूप किंवा दुःखरूप नसतातच, त्या केवळ आपल्या बुद्धीच्या किंवा अपेक्षांच्या बदलत्या छायेत वेगवेगळ्या रूपात भासतात म्हणूनच, कल्पना ही मनाचे एक खेळणे आहे.
जसे मुलं अनेक खेळणी घेतात, एक मोडले की दुसरे घेतात, पण शेवटी दोन्ही बाजूला ठेवून शांत होतात. तसेच मनाच्या कल्पना क्षणोक्षणी बदलत राहतात आणि शेवटी त्या सर्व सोडून दिल्या की खरी शांतता मिळते. जसे शिल्पकार दगडावर वारंवार छिन्नीचे प्रहार करतो, प्रत्येक प्रहाराने जुनी आकृती मोडतो आणि शेवटी त्या दगडातून नवे शिल्प प्रकट होते. तसेच एका कल्पनेने समोर दुसरी कल्पना सोडावी लागते आणि शेवटी सर्व कल्पना विसर्जित व्हाव्यात.
खरं तर कल्पना करायचीच, तर ती भगवंताची करावी. कारण भगवंत हा स्थैर्याचा केंद्रबिंदू आहे. जसा आकाशातील ध्रुवतारा प्रवाशाला दिशा दाखवतो, तसे भगवंताशी जोडलेले मन जीवनाला मार्गदर्शन करते. सुख-दुःखाच्या वादळांतही ही दिशा कधीच हरवत नाही. आता असं पाहा की, “माझ्याकडे अमुक आहे म्हणून मी सुखी आहे” ही वृत्ती क्षणभंगूर आहे. ती जणू वाऱ्याच्या झोतावर उभी असलेली दिवटी आहे. थोडा झोत आला की, ती विझते. पण “माझ्याकडे काही नसले तरी मी समाधानी आहे, कारण माझे मन भगवंताशी अखंड जोडलेले आहे” ही वृत्तीच खरी स्थिरता आहे. ती जणू पर्वताच्या शिखरावर उभा असलेला दीपस्तंभ आहे, म्हणूनच कितीही वादळे आली, पाऊस कोसळला तरी, तो अढळ राहतो.
याच स्थिरतेत परमार्थाचे बीज आहे. भगवंताजवळ मागायचे असेल तर हेच मागावे की, मनाची वृत्ती त्याच्याशी अखंड जोडलेली राहो. बाकी सर्व मागण्या क्षणिक आहेत. कारण त्या येतात आणि जातात. कसं आहे ना की, वैभव, नाती, यश, सन्मान हे सारे प्रवाहातील लाटा आहेत. त्या क्षणभर आनंद देतात, पण पुढच्या क्षणी नाहीशा होतात. भगवंताशी जोडलेली वृत्ती मात्र शाश्वत आहे.
जीवनाचा खरा अर्थ हाच आहे की, मनुष्याने आपल्या वृत्तीला स्थिरतेचा आधार द्यावा. जसे वृक्षाच्या मुळाशी पाणी मिळाले की तो हिरवागार होतो, तसेच मन भगवंताशी जोडले की, जीवन हिरवेगार होते. सुख-दुःखाच्या ऋतूंचा परिणाम त्याच्यावर होत नाही म्हणूनच, भगवंताजवळ मागावे ते वैभव, यश किंवा मान-सन्मान नव्हे तर मनाची अखंड स्थिरता, वृत्तीचे समाधान आणि अंतःकरणाची शांतता मागावी. कारण, हेच शाश्वत आहे आणि याच्यातच परमार्थाचे खरे मर्म दडलेले आहे.