भाईंदर : धूळ नियंत्रण, बांधकाम सुरक्षेविषयी उपाययोजनांचे पालन न करता इमारतीचे बांधकाम करणाऱ्या शहरातील ४० पेक्षा जास्त बांधकाम प्रकल्पांना नोटिस देण्यात आल्या आहेत. नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास इमारत बांधकामे व इतर प्रकल्पांची कामे बंद करून बांधकाम परवानगी रद्द करण्याचा इशारा पालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी दिला आहे. २३ नोव्हेंबरच्या दै. 'प्रहार'च्या अंकात 'भाईंदरमध्ये नियम धाब्यावर बसवून इमारती उभारल्या' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत मिरा-भाईंदर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांपासून हवेच्या प्रदूषणामध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. नागरिकांना दूषित वातावरणात श्वास घेणेही मुश्कील झाले असून आरोग्य समस्यादेखील वाढल्या आहेत. फुफ्फुस, हृदय, दमा, खोकला व डोळ्यांच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याला बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणाहून येणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेने नियमावली जाहीर करून वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक असल्यास काम बंद करण्यात येईल असा इशारा दिला. यावर नजर ठेवण्यासाठी ६ प्रभागांमध्ये भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या अति. आयुक्त, उपायुक्त व सहा. आयुक्तांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नगररचना विभागाकडून ४० बांधकाम प्रकल्पांना नोटिस काढल्या आहेत. उर्वरित प्रकल्पाची पाहणी करून त्यांनाही नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती पुरुषोत्तम शिंदे सहाय्यक संचालक नगर रचना विभाग यांनी दिली आहे.






