मोहित सोमण:ग्लेनमार्क फार्मा या भारतातील मोठ्या फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांगली वाढ झाली आहे. सत्र सुरूवातीच्या काळात शेअर २% पर्यंत उसळला होता. दुपारी १ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १.०१% उसळत १९४०.६० रूपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीला युएस स्थित अन्न नियामक व सुरक्षा मंडळ (US Food and Drug Administration FDA) यांच्याकडून ईआयआर (Establishment Inspection Report) प्राप्त झाल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे कंपनीच्या युएस मधील मोनरोई, नॉर्थ कॅरोलिना युएस येथे उत्पादन प्रकल्प सुरु करण्याच्या प्रस्तावाला एफडीएने परवानगी दिली गेली असल्याचे कंपनीने आज जाहीर केले. या सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठा प्रतिसाद दिला होता.
कंपनीच्या उत्पादन सुविधेत ०९ जून ते १७ जून २०२५ या कालावधीत ही तपासणी करण्यात आली.या सकारात्मक घडामोडींसह, आम्ही व्यावसायिक उत्पादन पुन्हा सुरू करू असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले. कंपनी भारतासह विदेशात काम करणारी एमएनसी फार्मा कंपनी आहे.
यापूर्वी कंपनीने १८ जूनला स्टॉक एक्सचेंज (BSE) फॉर्म-४८३ बद्दल माहिती दिली होती. त्यात कंपनीसाठी एफडीए कडून आलेले वॉर्निंग लेट अंतर्भूत होते असे कंपनीने स्पष्ट केले होते मात्र कंपनीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर शेअरमध्ये तेजी दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, ग्लेनमार्क फार्माने क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजच्या उपचारांसाठी जगातील पहिली नेब्युलाइज्ड, फिक्स्ड-डोस ट्रिपल थेरपी लाँच केली होती.
त्यांनी त्यामध्ये केलेल्या निवेदनात,'नेब्झमार्ट GFB स्मार्ट्यूल्स आणि एअर्झ एफबी स्मार्ट्यूल्स लाँच केले. श्वासनलिकेतील अडथळा, जळजळ कमी करण्यासाठी आणि फुफ्फुसांचे कार्य आणि लक्षण नियंत्रण सुधारण्यासाठी ग्लायकोपिरोनियम, फॉर्मोटेरॉल आणि बुडेसोनाइडसह तीन सिद्ध औषधे एकत्र करतात' असे त्यात म्हटले आहे.
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ही एक आर अँड डी करणारी जागतिक फार्मा कंपनी आहे. कंपनी ब्रँडेड, जेनेरिक्स आणि ओटीसी विभागांमध्येही कार्यरत आहे. श्वसन, त्वचाविज्ञान आणि ऑन्कोलॉजीच्या उपचारात्मक क्षेत्रात कंपनी काम करते. कंपनीकडे चार खंडांमध्ये पसरलेल्या ११ उत्पादन सुविधा आहेत आणि ८० हून अधिक देशांमध्ये कंपनी कार्यरत आहे. गेल्या एक महिन्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये ६.८३% वाढ झाली आहे तर ६ महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ३९.८२% वाढ झाली आहे.






