मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. जेजुरीसह विविध ठिकाणी अभिषेक, भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत भक्तांनी देवदर्शनाचा आनंद लुटला. दरवर्षीप्रमाणे यंदाही जेजुरीत उत्साहाची लाट उसळली. मात्र, काहींना प्रत्यक्ष जेजुरीला जाणं शक्य नसतं. अशा भाविकांसाठी मुंबईतच एक खास पर्याय उपलब्ध आहे.
मुंबईतही खंडेरायाचं शांत, पवित्र मंदिर
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सतत धावत्या मुंबईतसुद्धा खंडोबाचं एक जुने मंदिर आहे. इथे सगळे विधी, कुळाचार आणि सोहळे पारंपरिक रीतीनुसार पार पाडले जातात. तळी भरण्यापासून बेलभंडारा उधळण्यापर्यंत सर्व विधी येथे घडतात. अनेक जणांच्या मते हे मंदिर म्हणजे मुंबईचीच जेजुरी. वर्षभर राज्याच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.
मलाबार हिलवर वसलेलं शांत देवस्थान
दक्षिण मुंबईतील मलाबार हिल–वाळकेश्वर रोडलगत बाणगंगा परिसरात हे मंदिर शांत वातावरणात वसलं आहे. स्थानिक मराठी कुटुंबांनी अनेक दशकांपूर्वी हे देवस्थान उभारल्याचं सांगितलं जातं. आकारानं लहान पण महत्त्वानं मोठं असलेलं हे मंदिर समुदायाभिमुख असून येथे दररोजची आरती, चंपाषष्ठीचे खास सोहळे आणि अन्य धार्मिक कार्यक्रम भाविकांना वेगळा अध्यात्मिक अनुभव देतात.
मंदिराचा पत्ता तिन बत्ती, वाळकेश्वर रोड, मलाबार हिल, मुंबई – 400006
इथं कसं पोहोचायचं?
रेल्वेनं येणारांसाठी चर्नी रोड हे सर्वात जवळचं स्थानक आहे. मरिन लाइन्स आणि चर्चगेटही सोयीस्कर पर्याय आहेत. बेस्ट बस, टॅक्सी अथवा कॅबनेही मंदिरापर्यंत सहज जाता येतं. गर्दी तुलनेनं कमी असल्याने शांतपणे दर्शन घेण्याची संधी मिळते. जेजुरीला जाता येत नसेल तर मुंबईतील हे प्रतिजेजुरी नक्कीच अनुभवण्यासारखं ठरते. याशिवाय मुंबईतील अनेक कोळीवाड्यांतही खंडोबाची मंदिरे असून तिथेही चंपाषष्ठीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.






