ज्ञानोपासना हीच काळाची गरज

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


काही विज्ञाननिष्ठ लोक असे म्हणतात की, ते परमेश्वर मानत नाहीत. विज्ञान हाच देव आहे असे ते लोक मानतात. विज्ञान हा देव आहेच. मात्र ते कसे काय हेच जीवनविद्या समजावून सांगते.


तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे की,
तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जाणती सज्ञान गुरुपुत्र
किंवा
तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण, सर्व अणूरेणू वागवीत


तुकाराम महाराजांनी ज्ञान हाच देव असे सांगितले आहे. विज्ञान हे सुद्धा ज्ञानच आहे. म्हणून विज्ञान हे सुद्धा देवच आहे. ज्ञान हा देव म्हणून विज्ञान हा देवच आहे. किंबहुना जीवनविद्या असं सांगते की, कुठल्याही क्षेत्रातले ज्ञान हे देवच आहे. देव कुणाला म्हणायचे? जीवनविद्येचे सगळे सोप्पे आहे, “जो देतो तो देव ’’. ही जीवनविद्येने देवाची सोपी व्याख्या केली. आम्ही असे सांगितले की, देतो तो देव व जरा विचार केला की असे कळते की ज्ञान आपल्याला सर्व काही देते. ज्ञान काय देते? स्वयंपाक कला हे ज्ञान असल्यामुळे आपण निरनिराळे पदार्थ बनवू शकतो. तोच भात, तीच पोळी, तीच भाजी असेल तर नवरा म्हणेल मी जातो हॉटेलमध्ये. घरी जेवणार नाही. पाककलेचा ज्यांनी अभ्यास केला असेल तर ते जेवण कसे करतील? जेवण जेवावे तर आमच्या बायकोच्या हातचेच. तिचा स्वयंपाक अत्यंत सुंदर आणि चविष्ट होतो. हे ज्ञानच तर आहे. ऑर्थोपेडिक उपकरणांच्या ज्ञानाने हात-पाय अधू असेल त्याला हात-पाय मिळतात. हे सुद्धा ज्ञानचं आहे. कुठल्याही क्षेत्रात जे शोध लागतात ते ज्ञानामुळेच लागलेले आहेत. शोधाचा संबंध विज्ञानाशी म्हणजेच ज्ञानाशी आहे. दुःखाचा संबंध अज्ञानाशी आहे. अज्ञान, ज्ञान आणि विज्ञान याचा विचार केला, तर जगात दुःख व सुख कशामुळे होते? ज्ञानामुळे सुख तर अज्ञानामुळे दुःख होते. विज्ञान हे ज्ञानच आहे हे लक्षात ठेवले तर या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही ठरवलेच पाहिजे. विज्ञान हे ज्ञान आहे व या ज्ञानामुळे निरनिराळे चांगले शोध लागतीलच पण त्यातील काही शोधांनी माणसांना मरणाच्या दारातही टाकले. उदाहरणार्थ पूर्वी तलवारी होत्या ज्यामुळे काही माणसे मारली जायची आता बंदुकीने एकाचवेळी किती माणसे मारली जातात? बंदुकीचा शोध लागला तिथेच ज्ञानच आले. विज्ञान हे देव आहे तसे ते सैतानही आहे. ज्ञानाचा उपयोग तुम्ही कसा करता त्यावर ते अवलंबून आहे, प्रत्येक गोष्टीचे तसेच आहे. तलवार ही चांगली आहे व वाईटही आहे. तलवारीने स्वसंरक्षण करता येते पण ती वाट्टेल तशी फिरवलीत, तर तुमच्या कक्षेत येईल तो मरेल. विस्तवाने स्वयंपाक करायचा की कुणाच्या झोपडीवर ठेवायचा हे तुमच्या हातात आहे.


कुठलीही गोष्ट चांगली अथवा वाईट हे तुमच्या ठिकाणी त्या गोष्टीबद्दल जे ज्ञान आहे त्यावरच अवलंबून आहे. म्हणूनच आपल्या समाजाच्या लोकमानसाच्या शांती आनंद प्रगतीसाठी योग्य ज्ञानोपासना हीच काळाची गरज आहे.

Comments
Add Comment

जीवनविद्या: काळाची गरज

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै हे जग सुखी व्हावे व आपले हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे या

पुरुषार्थ

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य पुरुषार्थ हा प्रत्येकामध्ये असतो. तो जागृत करून योग्य पराक्रम गाजवता आला पाहिजे.

माँ नर्मदा

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे स्मरणात जन्मजं पापं दर्शनेन त्रिजन्मजम् ! स्नानात्

कृतीचे सौंदर्य हेतूतच

ऋतुराज : ऋतुजा केळकर हेतू शुद्ध असेल, तर कर्म फुले... मन निर्मळ असेल, त

ज्ञानी व्हा, धन्य व्हा!

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज आपण ज्या विषयाला सुरुवात करत आहोत तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. हा विषय सर्व

मनातील कलह

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य माणूस हा विचार करणारा, जाणिवा असलेला जीव आहे. त्याच्या प्रत्येक कृतीमागे,