मुंबई : आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई करावे का, या मुद्द्यावर निर्माण झालेल्या राजकीय वादाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, “आमच्यासाठी हे शहर कायम मुंबईच राहिलं आहे. बॉम्बेचं मुंबई करण्यात भाजपचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे आयआयटी बॉम्बेचं नाव अधिकृतपणे ‘आयआयटी मुंबई’ करण्याची विनंती मी स्वतः पंतप्रधान आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांना करणार आहे.”
जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला
अलीकडेच आयआयटी मुंबईतील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, “आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात आलं नाही, हे योग्यच आहे,” असं विधान केलं. त्यांच्या या शब्दांनंतर महाराष्ट्रात संताप उसळला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना फडणवीस म्हणाले, “बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे सर्वात पुढाकार भाजपचे दिवंगत नेते राम नाईक यांचा होता. मुंबईच नाव सर्वत्र रूढ व्हावं, ही आमची भूमिका कायम आहे.” त्यांनी पुढे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं, “काही जण स्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात, त्या शाळेचं नाव बदलण्याची मागणी मात्र करत नाहीत.”
ते पुढे म्हणाले, “जितेंद्र सिंह यांचा मुंबई, महाराष्ट्र किंवा गुजरातशी काहीही संबंध नाही. तरीही अशा प्रकारची वक्तव्यं करण्यामागे कोणती प्रवृत्ती आहे, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तमाम मराठी जनतेने आता तरी डोळे उघडावे.”
या वादामुळे ‘IIT Bombay vs IIT Mumbai’ हा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, नावांवरील राजकारणाला नव्याने पेटायला सुरूवात झाली आहे.