मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खालावलेला असून दक्षिण मुंबईपासून पूर्व व पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे मुंबईमधील दृश्यमानता कमी झाली होती. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, इथिओपियाच्या ज्वालामुखीच्या राखेचे कण हवेद्वारे वाहून आले असले तरी ते मुंबईवर वाहून आलेले नाहीत. गुजरात, राजस्थानवरील पट्ट्यात त्याचा प्रभाव दिसला. हे राखेचे कण वातावरणात अत्यंत वरच्या उंचीवर होते. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत नोंदविण्यात आलेले प्रदूषण ज्वालामुखीच्या राखेच्या कणांचे नाही. मुंबईमधील हवा खराब म्हणजे रोजचे प्रदूषण आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढते. कारण हवा स्थिर राहते. हवामानातील बदलामुळे प्रदूषण वाढू नये म्हणून बांधकामांना नोटीस देण्यापासून प्रदूषण करणाऱ्या बेकऱ्या बंद करण्याची कारवाई सुरू असते. प्रदूषण होऊ नये म्हणून उपाययोजना सुरू असून, गेल्या वर्षी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे कुलाबा, भायखळा आणि बोरिवलीतील बांधकामे बंद केली होती. यावर्षीही कारवाई सुरूच राहील, असे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.