'ग्लोबल साऊथ'चा आवाज : भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जी-२० शिखर परिषदेत सहभाग घेऊन ग्लोबल साऊथ आपल्या उपस्थितीने आणि मुद्देसूद भाषणाने सर्व जगावर छाप सोडली. त्यांनी जगाला आरोग्य आणि सध्या गाजत असलेला आर्टिफिशल इंटलिजन्स या विषयावर जगाला मंत्र दिला. त्याचवेळी ते म्हणाले की, सुरक्षा परिषदेत सुधारणा हा विकल्प नाही तर आजच्या काळाची गरज आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व देण्यावर चर्चा होते, पण त्याबाबत अजून ठोस निर्णय अमेरिका आणि चीन आदी राष्ट्रे घेऊ शकलेली नाहीत. पण त्यापेक्षाही हे महत्त्वाचे आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा यांनी म्हटले, अमेरिकेचा बहिष्कार असतानाही राजनैतिक तणावामुळेही जी-२० शिखर परिषद रुळांवरून घसरणार नाही. अमेरिकेचा कितीही त्रागा असला तरीही शिखर परिषद यशस्वी करण्यात दक्षिण आफ्रिकेने पुढाकार घेतला आणि अमेरिकेच्या दडपशाहीपुढे जग झुकणार नाही हे सिद्ध केले. मोदी यांनी एआयचा दुरुपयोग रोखण्यासाठी एक जागतिक समझोत्याचे आवाहन केले. मोदी यांनी शिखर परिषदेत जगापुढे प्रश्न बनून उभ्या राहिलेल्या सर्व प्रमुख समस्यांची सोडवणूक करण्याविषयी उल्लेख केला आणि नुसते उल्लेख करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी यावर उपाय सांगितला. याच परिषदेत मोदी यांनी अनेक द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबर चर्चा केली आणि त्यात फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचाही समावेश होता. भारताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. अमेरिका आणि युरोपची दादागिरी यामुळे संपली असे म्हणायला हरकत नाही. कारण जी-२० ने आता जगाचे नियम बदलले आहेत. इतके दिवस जी-२० ही केवळ अमेरिकेच्या इशाऱ्यावर चालत होती. अगदी जागतिक आरोग्य संघटनेलाही अमेरिकाच आर्थिक मदत देत होती. पण आता अमेरिकेचा बहिष्कार असतानाही तिचे काहीही चालले नाही हे यातून सिद्ध झाले आहे.


अगदी पूर्वीपासूनच जगातील सारे नियम धनाढ्य देश ठरवत आले आहेत आणि बाकी सारे जग त्यांच्या तालावर नाचत होते. पण आता ते दिसले नाही. ही केवळ एक बैठक नव्हती तर ग्लोबस साऊथचे शक्तिप्रदर्शन होते. ज्या दक्षिण आफ्रिकेला मोदी यांनी जी-२० चा सदस्य बनवून एक आपल्या डावपेचाची चुणूक दाखवली. त्याच दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेला आणि साऱ्या श्रीमंत देशांना अस्मान दाखवले आहे. ज्या बदलाची ठिणगी मोदी यांनी पेटवली होती ती आता दक्षिण आफ्रिकेत ज्वालामध्ये रूपांतरित झाली आहे आणि त्यात पाश्चात्त्य राष्ट्रे आणि युरोप भस्मसात झाला आहे. त्याचबरोबर हेही सिद्ध झाले आहे की, जग आता सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या पाश्चात्त्य तत्त्वावर चालणार नाही तर त्याचे स्वतःचे नियम असतील. या शिखर परिषदेतून जगाला एकच संदेश गेला आहे तो म्हणजे अमेरिका आणि युरोप आता इतरांना कुचलून पुढे जाऊ शकणार नाहीत. एकही देश यातून मागे राहिला तर जग हरेल हा संदेश या परिषदेतून जगाला देण्यात परिषद यशस्वी झाली आहे आणि मोदी यांचा हाच तर उद्देश आहे, की कोणत्याही राष्ट्राची मनमानी यापुढे भारत सहन करणार नाही. याच परिषदेत अमेरिकेचे एक दुय्यम शिष्टमंडळ सहभागी झाले होते पण त्यातून सकारात्मक दिशा दिली आहे ती म्हणजे युक्रेनशी सकारात्मक चर्चा होऊ शकते. या शिखर परिषदेतून महत्त्वाचा संदेश हा दिला गेला आहे की, सर्व महाशक्तींना असा इशारा दिला आहे की, सुधारा अथवा नष्ट व्हा. कारण सर्व जग सध्या एका धोकादायक कालखंडातून जात आहे. सर्वत्र उपासमार, युद्ध आणि असमानता यामुळे संघर्ष पेटलेला आहे. शिखर परिषदेने असा इशारा दिला आहे, की आता खूप झाले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरचा जो विनाश इतके दिवस अमेरिका आणि साथीदार देशांनी चालवला होता तो आता थांबवा. त्यांच्याकडून आता शक्तीचा उपयोग सहन केला जाणार नाही. या सर्व शक्ती संघर्षात भारताचा एक इशारा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे ड्रग दहशतवादाविरोधात मोदी यांनी दिलेली हाक आणि त्याला जागतिक राष्ट्रांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद.


ड्रग संकटाशी सारे जग झुंजत आहे आणि त्यात आफ्रिकेतील देशापासून ते पाकिस्तानपर्यंतच्या देशांचा समावेश आहे. त्यामुळे या युद्धात सर्व जगाने सामील होण्याची दिलेली हाक ऐकली गेली नसती तरच नवल होते. पण हे आवाहन करतानाही ज्या दक्षिण आफ्रिकेत ही परिषद भरली होती तेथील तरुणांना मोदी यांनी आवाहन केले, की पारंपरिक ज्ञान भांडार पुढील पिढ्यांना सक्षम करण्यासाठी त्याचा वापर करेल. यात आफ्रिकेतील तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी १० लाख प्रशिक्षकांचा समूह प्रस्थापित केला जाईल आणि त्याद्वारे स्थानिक क्षमता निर्माण होतील. क्रिटिकल मिनरल्स यावर जोर देतानाच मोदी यांनी जागतिक अन्न सुरक्षेवर भर दिला आणि त्यासाठी जी-२० शिखर परिषदेचा उपयोग करून घेतला. त्याचबरोबर हवामान आणि इतरही अनेक विषयांचा उल्लेख केला. आपली सर्व चर्चा ही फलदायी झाली असे त्यांनी काल देशात परतल्यावर सांगितले. या संपूर्ण शिखर परिषदेवर मोदी यांची छाप होती आणि ज्या भारताचे नेते केवळ पूर्वी श्रोते म्हणून हजेरी लावत असत त्यांना आता महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळते आहे हा भारताचा गौरव आहे आणि तो मोदी यांनीच घडवून आणला आहे. या सर्व परिषदेवर दक्षिण आफ्रिकेने हा ऐतिहासिक क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली ती अगदी रास्त होती. ट्रम्प यांच्या हल्ल्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील अधिक एकत्र आले आहेत आणि या परिषदेचा मोठा फायदा झाला आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरण आणि त्याविरोधात कसा लढा द्यायचा यावर भारतासह तिन्ही देशाना मार्ग सापडण्याची शक्यता आहे. या त्रिपक्षीय गटामुळे त्यांना बहुपक्षीय व्यवस्थेत एकमेकांच्या अधिक निकट येणे आणि स्वायत्त आर्थिक एकत्रीकरण शक्य होणार आहे.

Comments
Add Comment

श्रमेव जयते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी संसदेत श्रम संहितेला मंजुरी देऊन भारतातील ४० कोटी कामगारांना त्यांच्या श्रमांचा

वंशाचे दिवे विझताना...

महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडाला असल्याने उमेदवारांची अडवाअडवी-पळवापळवी,

बिकट वाट वहिवाट...

बिहारचे ३५वे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी काल पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी भारतात सर्वाधिक काळ

काँग्रेसची मनधरणी

निवडणुका जाहीर होईपर्यंत नकली डरकाळ्या फोडणाऱ्या उबाठाला प्रत्यक्ष मैदान दिसू लागताच कसा घाम फुटला आहे, हे

न्यायाची ऐशीतैशी

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाक्यातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाने फाशीची सोमवारी

पाकचा ब्ल्यू आईड बॉय

पाकचे जनरल असीम मुनीर यांना पाकमध्ये अभूतपूर्व अधिकार देण्यात आले आहेत आणि त्यामुळे त्यांना आयुष्यभर