स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील
गर्भावस्था ही स्त्रीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी अवस्था असली तरी काही प्रसंगी हार्मोनल व शारीरिक बदलांमुळे विशिष्ट आजार उद्भवू शकतात. त्यापैकी एक महत्त्वाचा विकार म्हणजे गर्भावस्थेतील यकृतातील कोलेस्टेसिस किंवा इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस ऑफ प्रेग्नन्सी (आयसीपी). हा आजार साधारणतः गर्भधारणेच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे २८-३२ आठवड्यांनंतर जास्त प्रमाणात दिसून येतो. या स्थितीत यकृतातील पित्ताचा प्रवाह व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे पित्तातील आम्ले रक्तात वाढतात आणि आई तसेच बाळ दोघांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते.
कारणे :
कोलेस्टेसिसचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे निश्चित नाही; तरीही खालील घटक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात:
१. हार्मोनल बदल : गर्भावस्थेत इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण खूप वाढते. या हार्मोन्समुळे यकृतातील पित्तवाहिन्यांची हालचाल (motility) कमी होते व पित्ताचा प्रवाह मंदावतो.
२. अनुवांशिक कारणे: कुटुंबात पूर्वी आयसीपी झालेल्या महिलांमध्ये पुनः आयसीपी होण्याची शक्यता अधिक असते. काही विशिष्ट जीन्समधील बदलांमुळेही हा विकार दिसू शकतो.
३. पर्यावरणीय घटक : व्हिटॅमिन D ची कमतरता, काही औषधे, यकृतावर ताण आणणारे पदार्थ, तसेच आहारातील फॅटी अॅसिडचे प्रमाण यांचाही काही प्रमाणात संबंध आढळतो.
४. जुळी किंवा त्रिकुट गर्भधारणा : अशा वेळेस हार्मोनल लोड जास्त असल्याने आयसीपी होण्याचा धोका वाढतो.
लक्षणे : आयसीपीचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे तीव्र खाज सुटणे (प्रुरिटस). ही खाज विशेषतः हाताच्या तळव्यांवर व पायांच्या तळव्यांवर अधिक जाणवते आणि रात्री ती वाढते. त्वचेवर पुरळ नसतानाही असह्य खाज आयसीपीकडे निर्देश करते.
इतर लक्षणांमध्ये :
अंगावर व शरीरावर सतत खाज थकवा, अशक्तपणा पिवळेपणा (jaundice) — काही स्त्रियांमध्ये दिसू शकतो गडद रंगाचे मूत्र फिकट रंगाची जुलाबासारखी शौच पोटात जडपणा किंवा अस्वस्थता अनेक वेळा लक्षणे बाळासाठी जास्त धोकादायक असतात, म्हणून निदान झाल्यापासून गर्भाचे नियमित निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते.
धोके : आईसाठी धोके :
आयसीपी सामान्यत: आईसाठी जीवघेणा नसतो; तरीही अस्वस्थता, निद्रानाश, पिवळेपणा यामुळे जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तसेच पुढील गर्भधारणेत आयसीपी पुन्हा होण्याची शक्यता ६०–७०% असते.
बाळासाठी धोके : आयसीपीमध्ये बाळासाठी काही गंभीर गुंतागुंत संभवतात:
अकाली प्रसूती, फिटल डिस्ट्रेस (बाळाला त्रास), मेकोनियम स्टेन्ड, लिकर आईच्या पोटात बाळाचा मृत्यू (stillbirth)-विशेषतः पित्तातील आम्ले अत्यंत वाढल्यास.म्हणूनच आयसीपीचे निदान झाल्यावर योग्य वेळी उपचार सुरू करणे आणि गर्भाचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे असते.
निदान : आयसीपीचे निदान प्रामुख्याने खालील तपासण्यांवर आधारित असते:
१. लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT): SGOT, SGPT वाढलेले आढळतात.
२. सीरम बिले अॅसिड्स (Serum Bile Acids) : सर्वात महत्त्वाची तपासणी.
३. १०-४० µmol/L : सौम्य
४. ४० µmol/L : गंभीर, भ्रूणधोक्याची शक्यता जास्त
५. बिलीरुबिन किंचित वाढू शकते.
६. इतर यकृताचे रोग जसे की व्हायरल हेपेटायटीस, गॉलस्टोन्स इ.पडताळून
वगळले जातात.
उपचार व व्यवस्थापन
आयसीपीचे मूलभूत उपचार उद्दिष्ट दोन आहेत : आईची लक्षणे कमी करणे आणि भ्रूण सुरक्षित ठेवणे.
१. औषधोपचार
उर्सोडिओक्सिकोलिक अॅसिड (Ursodeoxycholic Acid (UDCA): ही सर्वात प्रभावी औषधोपचार पद्धती. पित्तातील आम्ले कमी होतात, खाज कमी होते आणि बाळासाठी धोकाकमी होतो.अँटीहिस्टामाइन्स : रात्रीची खाज कमी करण्यासाठी.
व्हिटॅमिन के : काही वेळेस रक्त गोठण्याच्या समस्येपासून बचावासाठी दिले जाऊ शकते.
२. गर्भाचे निरीक्षण
एनएसटी (नॉन-स्ट्रेस टेस्ट)
बीपीपी(बायोफिजिकल प्रोफाइल)
डॉपलर
फेटल मूव्हमेंट मॉनिटरिंग
ही तपासणी नियमितपणे केल्यास बाळाच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवता येते.
३. प्रसूतीचा निर्णय
गंभीर आयसीपीमध्ये ३६-३७ आठवड्यांदरम्यान प्रसूती घडवून आणणे सुरक्षित मानले जाते. पित्तातील आम्ले खूप वाढल्यास किंवा बाळाच्या हालचाली कमी झाल्यास तातडीचा निर्णय घेतला जातो.
प्रतिबंध व सल्ला
अनावश्यक तेलकट व जंक फूड टाळणे.व्हिटॅमिन डीची पातळी व्यवस्थित ठेवणे. पूर्वी आयसीपी झाल्यास लवकर गर्भधारणेतच एलएफटी व आम्लपित्त तपासणी करणे.खाज सुरू होताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे. स्वतःहून औषधे घेणे टाळणे.
निष्कर्ष :
गर्भावस्थेतील यकृतातील कोलेस्टेसिस हा गर्भधारणेत दिसणारा तुलनेने विशिष्ट पण महत्त्वाचा विकार आहे. आईला तीव्र खाज जाणवत असली तरी खरी चिंता बाळाच्या सुरक्षिततेची असते. वेळेवर निदान, योग्य औषधोपचार, सतत गर्भाचे निरीक्षण आणि योग्य वेळी प्रसूती यामुळे आई आणि बाळ दोघांचीही सुरक्षितता सुनिश्चित करता येते. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून, प्रत्येक गर्भवतीने खाज किंवा यकृतविषयक लक्षणांना दुर्लक्ष न करता तातडीने तपासणी करणे हेच सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.