यवतमाळ : वणी परिसरातील लालपुलिया भागात निकृष्ट आणि प्रदूषणकारक कोळशाची खुलेआम विक्री करणाऱ्या कोळसा माफियांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने १९ नोव्हेंबरला अचानक छापा टाकत अनेक डेपोंची तपासणी केली आणि गुणवत्ता तपासणीसाठी नमुने जप्त केले. या कारवाईमुळे स्थानिक कोळसा व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधून अत्यंत स्वस्त दरात खरेदी केलेला निकृष्ट दर्जाचा कोळसा चांगल्या प्रतीच्या कोळशात मिसळून तो बाजारात उच्च दरात विकला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. मंत्रालयाच्या नियमांनुसार अशा कोळशाची विक्री केवळ निश्चित ‘एंड यूजर’लाच करण्याची परवानगी असताना काही व्यापाऱ्यांनी हे नियम धाब्यावर बसवून हा बेकायदेशीर प्रकार सुरु ठेवला होता.या गंभीर गैरव्यवहाराची दखल घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. तर गुणवत्ता अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अतिशय कठोर पाऊले उचलली जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या रॅकेटचे धागेदोरे नागपूर आणि चंद्रपूरमधील काही मोठ्या कोळसा व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. छत्तीसगडमधून येणाऱ्या कोळशात वणीमध्ये भेसळ करून तो विविध ठिकाणी रवाना केला जात असल्याचा संशय होता. मात्र तपासाचा वेग आणि मिळणारे पुरावे यावरून लवकरच या रॅकेटमध्ये असणाऱ्या बड्या व्यापारांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशासनाने उशिरा या होईना पण या रॅकेटवर कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.