प्रतिनिधी: मूलभूत पायाभूत सुविधा उभारणी व डेटा सेंटर विस्तृत करण्यासाठी अदानी समुहाने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. अदानी समुहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्राईजेस व ऐजकॉनेक्स (EdgeConneX) यांच्यातील भागीदारी असलेल्या 'अदानी ऐजकॉनेक्स' या कंपनीचे संपूर्णपणे १००% भागभांडवल अदानी समुहाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. किंबहुना तो व्यवहारही पूर्ण केलेला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत समुहाने या अधिग्रहणाबाबत म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर निर्मितीसाठी अदानी समुहाने हे अधिग्रहण केले आहे.
आपल्या डेटा इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी कंपनीने ही योजना आखली होती अखेर याची अंमलबजावणी झाली आहे. हैद्राबाद, पुणे, नवी मुंबई यासह इतर शहरातही कंपनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवणार आहे. कंपनीने हे देखील म्हटले आहे की, सध्या अस्तित्वात असलेले ट्रेडकॅसेल पार्क (Trade Castle Park) ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होणार होते मात्र ते आता सुरू होऊ शकते. हे अद्याप ऑपरेशनल झाले नसले तरी लवकरच या प्रकल्पाची सुरूवात होऊ शकते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गौतम अदानी यांचे पुत्र व अदानी सेझ कंपनीचे संचालक करण अदानी यांनी केलेल्या घोषणेत गुगलच्या सहाय्याने जगातील सर्वात मोठ्या ग्रीन डेटा सेंटरपैकी एक सेंटर उभे करणार आहेत.
अदानी एंटरप्रायझेसचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) 'अदानी ऐजकॉनेक्सने २३१.३४ कोटींना ट्रेड कॅसल टेक पार्क विकत घेऊन त्यांच्या पायाभूत सुविधा विस्तार धोरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हे संपादन तंत्रज्ञान पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्षमता वाढवण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांमध्ये एक उल्लेखनीय पाऊल आहे.