Thursday, November 20, 2025

दादरमधील प्रभाग १९२ कुणाकडे? उबाठा आणि मनसेमध्येच चढाओढ

दादरमधील प्रभाग १९२ कुणाकडे? उबाठा आणि मनसेमध्येच चढाओढ

मुंबई (सचिन धानजी) : उबाठा आणि मनसेची युती होणार असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीकोनातून पावले टाकली जात असली तरी माहिम विधानसभेतील दादर मधील प्रभाग १९२मध्ये जागा वाटपावरून दोन्ही पक्षांत मारामारी होण्याची चिन्हे आहेत. हा प्रभाग उबाठाचा असला तरी यंदा हा प्रभाग खुला झाल्याने मनसेचा दावा आहे. परंतु या दोन्ही पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आणि स्पर्धा एवढी वाढली आहे की नक्की कोणत्या पक्षाला हा प्रभाग मिळेल याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दादरमधील प्रभाग क्रमांक १९२ हा महिला आरक्षित होता आणि आता हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गाकरता राखीव झाला आहे. या प्रभागातून उबाठा शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांची पत्नी प्रीती पाटणकर हे निवडून आली होती. परंतु आता हा प्रभाग खुला झाल्याने यावर उबाठाचा पहिला दावा असला तरी माहिम विधानसभेत तीन प्रभाग खुले झाल्याने त्याच ठिकाणी मनसेने दावा केला आहे. त्यामध्ये भाजपाच्या नगरसेविका असलेल्या शीतल गंभीर यांचा प्रभाग १९०. उबाठाच्या नगरसेविका प्रीती पाटणकर यांचा १९२ आणि शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांचा प्रभाग १९५वर दावा केला आहे. त्यात उबाठाच्या प्रीती पाटणकर यांच्या प्रभाग १९२वर मनसेने हक्काने दावा केला असला तरी हा प्रभाग आपल्या पक्षाचा असल्याने तो मनसेला सोडण्यात येवू नये यासाठी प्रकाश पाटणकर यांचा प्रयत्न आहे. या प्रभागातून उबाठाचे चंद्रकांत झगडेही इच्छुक आहेत. तसेच शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्याही नावाची चर्चा आहे.

तर या प्रभागातून मनसेच्यावतीने यशवंत किल्लेदार आणि स्नेहल जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. राज ठाकरे हे यंदा यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी प्रभाग १९२ हाच अनुकूल आहे. त्यामुळे यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देण्यावर पक्ष ठाम असला तरी माजी नगरसेविका स्नेहल जाधव यांचेही जोरदार प्रयत्न सुरु आहे. परंतु पक्षाने स्नेहल जाधव यांच्या इच्छुकांच्या यादीतील नावानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी अशाप्रकारचा सूर आळवल्याचेही एेकायला मिळत आहे. तर उबाठा आणि शिवसेनेत हा प्रभाग कुणाच्या वाट्याला जाईल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने तसेच त्यांचा तिढा सोडवणे कठिण असल्याने दोन्ही पक्षापुढे या प्रभागात मोठ्या अडचणी आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >