मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या ताब्यात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आल्यानंतर या रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च मागील दोन ते तीन वर्षांत करण्यात आला आहे. हा खर्च करण्यात आल्यानंतर आता या दोन्ही मार्गावरील एमएसआरडीसीच्या ताब्यातील सर्व पुलांची डागडुजी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहे. या दोन्ही मार्गावरील एमएसआरडीसीच्या ताब्यातील पूल तसेच महत्वाच्या भागांच्या पृष्ठभागाची सुधारणा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी.ए यांच्या ताब्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग हा मुंबई महापालिकेला या रस्त्याची सुधारणा आणि देखभाल करण्याच्या दृष्टिकोनातून ०३ ऑक्टोबर २०२२ ला हस्तांतरित करण्यात आला. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, तर १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद असा शीव ते मुलुंड हा पूर्व द्रुतगती महामार्ग आहे. या दोन्ही मार्गांवरील पावसाळ्यापूर्व व पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी,खराब भागाचा विकास करण्यासाठी तसेच सेवा रस्ते,पदपथ यांची देखभाल, गटारांवरील झाकणे आदी कामांसाठी दोन्ही मार्गांसाठी एकाच ठेकेदाराची अडीच वर्षांपूर्वी निवड करण्यात आली होती.
तब्बल २७.८५किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पावसाळ्यापूर्वीची प्रतिबंधात्मक देखभाल पावसाळ्यात दरम्यान या रस्त्याची कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत राखण्याच्या दृष्टिकोनातून दोन वर्षांच्या कालावधी के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड - कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड केली आहे. या साठी करांसह १३१कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती.
तर मुंबईतील मुलुंड ते शीव हा पूर्व द्रुतगती महामार्ग १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद आहे. पावसाळ्यात या महामार्गावर खड्डे पडू नये यासाठी मागील वर्षी दोन वर्षांकरता के आर कंस्ट्रक्शन कंपनीची निवड केली. या यासाठी विविध करांसह ९३ कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली होती. याशिवाय दोन्ही मार्गांवर सेवा रस्त्यांवर एकूण २०० कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यास आली आहे.
त्यातच आता पूर्व द्रुतगती महामार्गावरील एमएसआरडीसी च्या ताब्यातील पुलावरील खराब झालेल्या पृष्ठभागाची सुधारणा करणे आणि इतर भागाची सुधारणा करणे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर साईट कॅरेजेस ची आणि खराब झालेल्या भागाची सुधारणा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह सुमारे १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे करण्यात आलेला आणि मंजूर झालेले कंत्राट काम..
पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश नियंत्रण प्रकल्प
प्रकल्प खर्च : ११२५.८८ कोटी रुपये
कंत्राटदार : आर पी एस इन्फ्राप्रोजेक्ट
पूर्व द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजी
एकूण खर्च : ९३ कोटी रुपये
कंपनी : के आर कंस्ट्रक्शन
पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणे व दुरुस्ती
एकूण खर्च : सुमारे ८५ कोटी रुपये
कंत्राट कंपनी : प्रीती कंस्ट्रक्शन कंपनी
पूर्व द्रुतगती मार्गाची मास्टिकने सुधारणा
एकूण खर्च : सुमारे १८ कोटी रुपये
कंत्राट कंपनी : शहा आणि पारीख
पूर्व द्रुतगती मार्गाची मायक्रो सरफेसिंगने सुधारणा
एकूण खर्च : ४६.३१ कोटी रुपये
कंत्राट कंपनी : मारकोलाईन्स पेवमेंट टेक्नॉलॉजिस
पश्चिम द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजी
एकूण खर्च : सुमारे १३१ कोटी रुपये
कंत्राट कंपनी : के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड - कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदार
पावसाळ्यापूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणे
एकूण खर्च : सुमारे ९० कोटी रुपये
कंत्राट कंपनी : कोणार्क स्ट्रक्चरल इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड