Sunday, January 25, 2026

धक्कादायक! नाशिकनंतर पुण्यातही चिमुकलीवर अत्याचार, ऊसतोड कामगाराचे अमानुष कृत्य

धक्कादायक! नाशिकनंतर पुण्यातही चिमुकलीवर अत्याचार, ऊसतोड कामगाराचे अमानुष कृत्य

पुणे: नाशिकच्या मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येचा विषय ताजा असतानाच, पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात ऊसतोड मजूर कुटुंबातील सात वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे पीडीत लहानगीवर अत्याचार करणारा तरूण त्याच वस्तीत राहणारा आहे. यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला जबरदस्तीने एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घाबरून घरी परतल्यानंतर तिने आई-वडिलांना याबाबत सांगितली. मुलीने आरोपीचे नाव स्पष्टपणे सांगितल्याने पालकांनी तात्काळ ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. देवीदास रोहीदास गर्जे (वय अंदाजे ३५) असे आरोपीचे नाव असून तोसुद्धा ऊसतोड कामगार आहे.

तक्रार दाखल केल्यानंतर ओतूर पोलिसांनी त्वरित कारवाई करत काही तासांच्या आत आरोपी देवीदास गर्जेला अटक करून भारतीय दंड संहितेनुसार कलम ३७६, ३७६ (२)(एन) आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांन्वये देविदास गर्जे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान पीडित बालिकेवर पुण्यातील शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असून वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >