मंत्री मंगलप्रभात लोढांना आमदार अस्लम शेखांनी दिली धमकी

मुंबई : मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी संपवण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी शेख यांच्या धमकीवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अस्लम शेख यांच्या मतदारसंघात मालवणीत वास्तव्याला असलेले हजारो रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात मोहीम उभारली आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून सध्या तिकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू आहे. प्रशासनाने त्या भागात पहिल्या टप्प्यात ९ हजार चौरस मीटरचा सरकारी भूभाग अतिक्रमण मुक्त केला असून कारवाई अद्याप सुरूच आहे.


एकीकडे मुंबई सारखे आंतरराष्ट्रीय शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्ट वर असताना आमदार अस्लम शेख मालवणीत अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालून ते शहराच्या सुरक्षेशी खेळत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही. स्थानिक आमदार हे सातत्याने समाज विघातक शक्तीला अभय देत असून भारतीय संविधानाच्या मुल्यांना ठेच पोहचविण्याचे काम करत आहेत. तसेच घुसखोर बांग्लादेशींच्या अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत आहेत. याबाबत पाठपुरावा करत असल्यानेच त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला संपवण्याची धमकी दिली असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


मालाड - मालवणीचे आमदार हे सातत्याने रोहिंगे आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीला प्राधान्य देऊन मालवणी पॅटर्न राबवत आहेत. चौक सभा घेऊन त्यांनी दिलेल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. उलट त्यांचा मालवणी पॅटर्न आम्ही मुळापासून उपटून टाकणार आहोत, असा संताप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. मंत्री लोढा यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही साटम यांनी केली आहे.


आमदार अस्लम शेख सारख्या विघटनवादी शक्तींनी कितीही धमक्या दिल्या तरी देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर कसलीही तमा न बाळगता रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात कठोर कारवाईचा पाठपुरावा करत राहणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कांदिवलीच्या चारकोप परिसरात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, चौघांना अटक

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात बांधकाम व्यवसायातून कोट्यवधींची नियमित उलाढाल होते. यामुळेच झटपट पैसा

निवडणूक होण्याआधीच नेत्यांच्या नातलगांचा बिनविरोध विजय, राजकीय पाठबळावर अनेकांची बिनविरोध निवड

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल,

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून प्रशासन सक्षमीकरणासाठी नवे व्यवस्थापन मंडळ स्थापन, तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल अंबानींच्या आरकॉमचे हात वर !

प्रतिनिधी: रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने गुरुवारी त्यांच्या कामकाजात प्रशासन आणि धोरणात्मक देखरेख

Mariott International: मॅरियटची भारतात मोठी घोषणा-लवकरच भारतात २६ नवी तारांकित हॉटेल्स जाणून घ्या फिचर्ससह प्रत्येकाची नावासगट यादी एका क्लिकवर!

प्रतिनिधी:जे डब्ल्यू मॅरियटसह इतर प्रसिद्ध ब्रँडसह पंचतारांकित हॉटेल चेन चालवत असलेल्या मॅरियट इंटरनॅशनलकडून

Kotak Stock Split : ४०व्या वर्धापनदिनी कोटक महिंद्रा बँकेकडून गुंतवणूकदारांना मोठे गिफ्ट! बँकेच्या १:५ स्टॉक स्प्लिटला मान्यता

मोहित सोमण: कोटक महिंद्रा बँकेकडून गुंतवणूकदारांना मोठे सरप्राईज देण्यात आले आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या

एचएसबीसी पीएमआय आकडेवारी जाहीर, उत्पादन व सेवा निर्देशांकात किरकोळ घसरण तरीही अर्थव्यवस्था 'अशाप्रकारे' टॉप गियरवरच

प्रतिनिधी: एचएसबीसीने आपला पीएमआय (Purchasing Manager Index PMI) खरेदी व्यवस्थापन निर्देशांकातील आकडेवारी आज जाहीर केली आहे.