दुबई : आंतरराष्ट्रीय 'एअर शो'मध्ये हवाई कसरती करत असताना भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. काही परदेशी वृत्तसंस्थांनी हे वृत्त देत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात एक विमान कोसळताना दिसत आहे.
हवाई कसरती करत असलेले विमान अचानक स्थिर झाले. यानंतर विमानाचे नाक थेट जमिनीच्या दिशेने वळले आणि काही सेकंदात विमान जमिनीवर कोसळले. वैमानिकाने इजेक्ट केले नव्हते. यामुळे दुर्घटनेत वैमानिक जखमी झाला असावा अथवा त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
विमान जमिनीवर कोसळताच आग लागली आणि धुराचे लोट आकाशाच्या दिशेने जात असल्याचे दिसू लागले. विमान कोसळल्याचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. भारताच्या हवाई दलाने एक प्रसिद्धीपत्रक काढून दुबईच्या एअर शो मध्ये भारताचे एलसीए तेजस विमान कोसळल्याची माहिती दिली आहे. वैमानिकाबाबत जाणून घेण्यासाठी घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे, असेही हवाई दलाकडून सांगण्यात आले.