पनवेल : ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-माणगाव मार्गावर सोमवारी सांयकाळी हा अपघात झाल्याची माहिती असून थार गाडी एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेने जिल्हा हादरला असून, मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, २० दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन पुण्यातील हे सहा तरुण कोकणात फिरायला निघाले होते. मात्र, या तरुणांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. रायगड जिल्ह्याच्या हद्दीत ताम्हिणी घाटात गाडी दुर्घटनाग्रस्त झाली. सोमवारी घडलेली घटना तब्बल चार दिवसांनी समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांचे वय १८ वर्षे ते २४ वर्षे असे असून सर्वजण पुण्यात राहणारे आहेत. कोकणात गेलेल्या या तरुणांशी संपर्क होत नसल्याने बुधवारी त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हापासून पोलिसांकडून या थार कारचा शोध सुरू होता. मात्र घाटात शोधकार्य करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली. अखेर गुरुवारी सकाळी ताम्हिणी घाटातील दरीत चक्काचूर झालेली थार आणि चार जणांचा मृतदेह आढळून आला आहे. बेपत्ता असलेल्या आणखी दोन जणांचा शोध सुरु आहे.
ताम्हिणी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटताच थार गाडी थेट खोल दरीत कोसळली. धोकादायक उतार, खोल दरी आणि चेंदामेंदा झालेल्या वाहनाचे अवशेष पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरले. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे. हा अपघात अत्यंत गंभीर असून, दरी खोल आणि दगडांनी भरलेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान बचाव पथकासमोर आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा ताम्हिणी घाटातील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपघातात शहाजी चव्हाण (२२), पुनित सुधारक शेट्टी (२०), साहील साधू बोटे (२४), श्री महादेव कोळी (१८), ओंकार सुनील कोळी (१८) आणि शिवा अरुण माने (१९) या सहा मित्रांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण पुण्यातील उत्तमनगर परिसरातील रहिवासी होते.